रोहित शर्मा हा फरफेक्ट फॅमिली मॅन आहे. त्याचे पत्नी रितिकावर खूप प्रेम आहे. रितिकाही जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या पतीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. तसेच, रोहित शर्माची मुलगी समायरदेखील रोहित शर्माला चीयर करण्याठी मैदानात येते.
रोहित ज्या प्रकारे आपल्या मुलीचे लाड करतो, त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत.
असाच एक व्हिडीओ आताही व्हायरल झाला आहे. पण यावेळी रोहित समायराचा नाही तर आर अश्विन याच्या मुलींचा लाड करताना दिसत आहे. यावेळी तिथे अश्विन त्याची पत्नी प्रीती नारायण हिच्यासह उपस्थित होता.
चेन्नई कसोटीत आर अश्विनने ६ विकेट घेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अश्विनच्या अष्टलपैलू कामगिरीमुळे भारताने बांगलादेशवर २८० धावांनी दणदणीत विजय मिळवला. अश्विनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाने २८० धावांनी जिंकली. या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. भारताच्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा लंचपूर्वी संघ २३४ धावांवर गडगडला.
भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. तर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर गारद झाला.
आर अश्विन भारताच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या आणि या सामन्याच्या पहिल्या दमदार फलंदाजी करत शतकही झळकावले.
सामन्याच्या शेवटी सामनावीर अश्विन त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीबाबत म्हणाला, की 'माझी ओळख गोलंदाज म्हणून आहे, त्यामुळे गोलंदाजी माझ्यासाठी प्रथम येते. फलंदाजी माझ्यासाठी नैसर्गिक असली, तरी गेल्या काही वर्षांत मी माझ्या फलंदाजीचा खूप विचार केला आहे". त्याच्या अष्टपैलू खेळाबद्दल तो म्हणाला, 'या दोन्ही पैलूंवर ताबा मिळवण्याबरोबरच मी एकत्र पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.'
पहिली कसोटी संपल्यानंतर काही वेळातच बीसीसीआयने कानपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली. चेन्नईत जिंकलेल्या याच संघाला २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी कायम ठेवण्यात आले आहे.