एकदिवसीय विश्वचषक २०१९ मध्ये अंबाती रायडूला संघात स्थान देण्यात आले नव्हते. अंबाती रायडूऐवजी विजय शंकर याला प्राधान्य देण्यात आले होते. यानंतर बराच गदारोळही झाला होता. मात्र, आता भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने या विषयावर मोठे वक्तव्य केले आहे.
अंबाती रायडूच्या निवडीत तत्कालीन भारतीय कर्णधार विराट कोहली याने अडथळा आणला होता, असे रॉबिन उथप्पाने म्हटले आहे. जर विराट कोहलीला एखादा खेळाडू आवडला नाही तर त्याचा अर्थ असा होता की तो खेळाडू संघासाठी योग्य नाही. सोबतच कोहली नेहमीच संघाच्या हिताचा विचार करतो, असेही उथप्पा म्हणाला.
लल्लनटॉपच्या मुलाखतीत बोलताना उथप्पा म्हणाला की, ‘रायुडू हा कोहलीच्या आवडत्या खेळाडूंमध्ये नव्हता. त्यामुळे त्याचे वर्ल्डकपचे तिकिट कापण्यात आले.
संघात प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात, मला मान्य आहे. पण एखाद्या खेळाडूला एका उंचीवर नेल्यानंतर आपण त्याला तिथेच सोडून देऊ शकत नाही.
याशिवाय रॉबिन उथप्पाने सांगितले की, विश्वचषकाची जर्सी, सूट आणि किटबॅग यासारख्या महत्त्वाच्या वस्तू अंबाती रायडूच्या घरी पाठवण्यात आल्या होत्या, मात्र असे असतानाही त्याची विश्वचषक संघासाठी निवड झाली नाही.
२०१९ चा वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळला गेला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला होता. याआधी भारताने इंग्लंड वगळता सर्व सामने जिंकले होते. त्याचबरोबर इंग्लंडने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
संबंधित बातम्या