Robin Uthappa on Yuvraj Singh Career : भारताचा धडाकेबाज आणि लढवय्या फलंदाज युवराज सिंग याचं करियर संपण्यात विराट कोहली याचा मोठा हात आहे. त्यानं युवराजसोबत अनेक चुकीच्या गोष्टी केल्या, असा गंभीर आरोप भारताचा माजी सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा यानं केला आहे.
विराट कोहली याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीबद्दल बोलताना उथप्पानं परखड मत मांडलं. युवराज भारतीय संघातून वगळला जाण्यासाठी विराटच जबाबदार आहे, असं उथप्पा म्हणाला. कॅन्सरशी झुंज देऊन मैदानात परतलेल्या युवराजला विराटनं कुठलीही सवलत दिली नाही, असं उथप्पा म्हणाला.
‘लल्लनटॉप’शी बोलताना उथप्पानं हे आरोप केलं. 'युवराजनं कॅन्सरला पराभूत केलं आणि तो आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्यांपैकी तो एक खेळाडू आहे. त्या विजयामध्ये युवराजची महत्त्वाची भूमिका बजावली. अशा खेळाडूबद्दल तुमचा दृष्टीकोन कसा असायला हवा? विराटनं त्याला संघर्ष करताना पाहिलं होतं. तरीही कर्णधार होताच त्यानं युवराजच्या उणिवा काढल्या. त्याच्या फुफ्फुसाची क्षमता कमी झाली आहे असं विराट म्हणाल्याचं उथप्पा यानं सांगितलं.
‘खेळाचा दर्जा राखला जायला हवा. मात्र नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणता येते. हा एक माणूस सलवत मिळवण्यास पात्र होता. त्यानं केवळ तुम्हाला स्पर्धा जिंकून दिली नाही तर, कर्करोगावरही मात केली आहे. या अर्थानं त्यानं आयुष्यातील खडतर आव्हान पेललं आहे,’ असं उथप्पा म्हणाला.
विराटनं युवराजला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही आणि फिटनेस चाचणीत कोणतीही सूट दिली नाही. कसोटीसाठी युवराजनं फिटनेस चाचणीची पातळी दोन गुणांनी कमी करण्यास सांगितलं होतं, परंतु कोहलीनं नकार दिला, असंही उथप्पानं सांगितलं.
'विराटनं सवलत न देताही युवराज फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला, संघात आला, पण स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही, म्हणून पुन्हा वगळला गेला. त्यानंतर त्याचा समावेश कधीच झाला नाही. त्यावेळी निर्णय प्रक्रियेत असलेल्यांनी त्याला संधी दिली नाही. विराट त्यावेळी कर्णधार होता आणि त्याचा शब्द चालत असल्यानं सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे घडलं, असं उथप्पा म्हणाला.
संबंधित बातम्या