दुलीप ट्रॉफी २०२४ चा थरार आजपासून (५ सप्टेंबर) सुरू झाला आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची निवड होणार आहे, यासाठी दुलीप ट्रॉफीतील पहिला सामना सर्वच खेळाडूंसाठी महत्वाचा आहे.
दरम्यान, दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना टीम ए आणि टीम बी यांच्यात बंगळुरूत खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल फ्लॉप ठरले आहेत.
दुलीप करंडक स्पर्धेतील अ आणि ब संघ यांच्यातील सामन्याला आजपासून सुरुवात झाली. अ संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जैस्वाल टीम बी साठी फलंदाजीला आले. सुरुवात चांगली दिसत होती, पण संघाची धावसंख्या ३३ धावांवर असताना कर्णधार अभिमन्यू १३ धावा करून बाद झाला.
यानंतर मुशीर खान यशस्वी जैस्वालला पाठिंबा देण्यासाठी आला. पण संघाची धावसंख्या ५३ धावांवर असतानाही जयस्वाल बाद झाला. त्याने ५९ चेंडूत ३० धावांची छोटी खेळी खेळली, त्याच्या बॅटमधून ६ चौकार आले.
टीम बीने लागोपाठ २ विकेट गमावल्यानंतर ऋषभ पंत क्रीजवर आला. ऋषभ पंत अपघातानंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. यापूर्वी, त्याने डिसेंबर २०२२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता.
पहिल्या डावात त्याला फक्त ७ धावा करता आल्या आणि त्यासाठी त्याने १० चेंडूंचा सामना केला. पंत आकाशदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. शुभमन गिलने त्याचा अप्रतिम झेल घेतला.
यानंतर सरफराज खानकडून आपल्या संघासाठी मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा होती, पण त्यानेही कामगिरी केली नाही. त्याने ३५ चेंडूंचा सामना केला आणि केवळ ९ धावा केल्या. नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खातेही उघडता आले नाही.
पहिला सामना संपल्यानंतरच निवड समितीची बैठक होईल, ज्यामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. दुलीप ट्रॉफीचे सामने फक्त ४ दिवस चालतात, त्यामुळे हा सामना पूर्ण वेळ खेळला गेल्यास हा सामना ८ सप्टेंबरला संपेल.
भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. अशा स्थितीत पुढील आठवड्यात टीम इंडियाची निवड होणार हे निश्चित आहे. निवडकर्त्यांच्या नजरा दुलीप ट्रॉफीवर आहेत, जे खेळाडू येथे चांगली कामगिरी दाखवतील त्यांची संघात निवड होऊ शकते, तर फ्लॉप झालेल्या खेळाडूंचे पत्ते कट केले जाऊ शकतात.