Gautam Gambhir on Wicketkeeper : इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी कोण सांभाळणार, रिषभ पंत आणि केएल राहुल? हा प्रश्न अनेक दिवस चर्चेत होता. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनं याचं उत्तर दिलं आहे. या स्पर्धेत केएल राहुल हा यष्टीरक्षणासाठी संघाची पहिली पसंती असेल, असं गंभीरनं म्हटलं आहे. पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये लगेच समावेश विचार केला जाणार नाही, असंही तो म्हणाला.
केएल राहुल यानं इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत यष्टीरक्षकाची भूमिका बजावली होती. तर, पंतला इंग्लंडविरुद्धच्या एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. राहुलला पहिल्या दोन सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्यात आलं होतं. त्या जागेवर तो थोडा गडबडलेला दिसला. मात्र, अहमदाबादमधील तिसऱ्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरताच त्यानं २९ चेंडूत ४० धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळं आता त्याची फलंदाजीची जागाही कदाचित बदलली जाऊ शकते.
राहुल हा सध्या आमचा नंबर वन यष्टीरक्षक आहे. तूर्त मी एवढंच सांगू शकतो. रिषभ पंतला संधी मिळेल पण राहुल सध्या चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही दोन यष्टीरक्षक-फलंदाजांसोबत खेळू शकत नाही, असं गंभीर म्हणाला.
'पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करणाऱ्या राहुलच्या जागेवर पहिल्या दोन सामन्यात अक्षर पटेलला संधी देण्यात आली होती. त्या निर्णयाचंही गंभीरनं समर्थन केलं. 'कोणत्याही व्यक्तीपेक्षा संघाचं हित महत्त्वाचं आहे. आम्ही सरासरी आणि आकडेवारी पाहत नाही. कोण चांगली कामगिरी करू शकतं हे आपण पाहतो, असं तो म्हणाला.
यशस्वी जयस्वालला चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आलं आहे. प्रशिक्षकांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. 'आम्हाला विकेट घेणारा गोलंदाज म्हणून पर्याय हवा होता आणि वरुण चक्रवर्ती हा पर्याय असू शकतो असं वाटतं. जयस्वाल याच्याकडं अजूनही खूप वेळ आहे आणि आम्ही केवळ १५ खेळाडूंची निवड करू शकतो ही अडचण आहे, असं गंभीर म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला होणार आहे.
संबंधित बातम्या