IPL 2025 Latest News : इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम सुरू होण्यास अद्याप २ महिन्यांचा कालावधी असतानाच १० पैकी ७ संघांनी आपल्या कर्णधारांच्या नावांची घोषणा केली आहे. लखनौ सुपर जायंट्स हा संघ कर्णधार घोषित करणारा सातवा संघ ठरला आहे. एलएसजीनं रिषभ पंत याच्यावर ही जबाबदारी दिली आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणारा पंत हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे.
लखनौच्या आधी पंजाब किंग्जनं आपल्या संघाच्या कर्णधाराची घोषणा केली होती. पीबीकेएसनं गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला संधी दिली आहे. त्याशिवाय इतर ५ संघांनी आयपीएल २०२४ मधील कर्णधारांवरच पुन्हा विश्वास टाकला आहे. यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांचा समावेश आहे.
दहापैकी ३ संघांनी अद्याप कर्णधारांची नावं घोषित केलेली नाहीत. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सध्याचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्या नावांचा समावेश आहे. बेंगळुरू, दिल्ली आणि कोलकात्याच्या संघाचा कर्णधार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामागे काही कारणं आहेत.
आरसीबीकडं विराट कोहलीशिवाय दुसरा कोणताही मोठा चेहरा नाही. याशिवाय केकेआरकडं मागील हंगामातील कर्णधार राहिलेला नाही. तर, दिल्लीचा संघ लोकेश राहुलवर कितपत विश्वास टाकेल हे सांगणं कठीण आहे. दिल्लीच्या संघासाठी दुहेरी कर्णधारपदाचीही चर्चा आहे. एकाच मोसमात दोन खेळाडूंकडं कर्णधारपद देण्याचा विचार असू शकतो. दिल्ली संघाचे दोन मालक आहेत आणि त्यांच्यात एकमत किती होतं यावर बरंच काही अवलंबून आहे. केकेआर अजिंक्य रहाणेकडं नेतृत्वाची धुरा सोपवू शकतो.
मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या
चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड
राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन
सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स
गुजरात टायटन्स - शुभमन गिल
पंजाब किंग्ज - श्रेयस अय्यर
लखनौ सुपर जायंट्स - ऋषभ पंत
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
दिल्ली कॅपिटल्स
कोलकाता नाइट रायडर्स
संबंधित बातम्या