दिल्ली प्रीमियर लीग T20 चा (Delhi Premier League T20, 2024) थरार शनिवारपासून (१७ ऑगस्ट) सुरू झाला. या स्पर्धेचा पहिला सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली पुरानी दिल्ली ६ आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात खेळला गेला.
पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली ६ ला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतचा फ्लॉप शो हे संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. पंत स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरल्याने चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली जुनी दिल्ली ६ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. संघासाठी कर्णधार पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण तो फारसा प्रभाव टाकू शकला नाही.
पंत १०९.३७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३२ चेंडू खेळून केवळ ३५ धावा केल्या, ज्यात ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.
पंतची ही खराब कामगिरी पाहून सोशल मीडियावरील चाहत्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
जूनमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियासाठी पंतची मुख्य यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, टी-20 विश्वचषकातही पंत काही विशेष करू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्डकप फायनल सामन्यात तर ऋषभ पंत शुन्यावर बाद झाला होता. आता दिल्ली प्रीमियर लीगमध्येही पंतच्या बॅटमधून विशेष काही आले नाही, जे पाहून चाहते निराश झाले आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.
एका यूजरने लिहिले की, "पंत स्पिनर्सविरुद्ध अजिबात चांगला खेळत नाही. याशिवाय आणखी एका युजरने म्हटले की, आम्ही पंतला मॅच विनर म्हणतो, पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सत्यपरिस्थिती वेगळीच आहे.
दिल्ली प्रीमियर लीग टी-20 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पुरानी दिल्ली ६ ने २० षटकात ३ बाद १९७ धावा केल्या. त्यांच्याकडून अर्पित राणाने ४१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा करत संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने १९.१ षटकांत १९८/७ धावा करून विजय मिळवला. संघाचा कर्णधार आयुष बडोनी आणि सलामीवीर प्रियांश आर्यने ५७-५७ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.