मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार, बीसीसीआयचा हिरवा कंदील; मोहम्मद शमी 'आऊट'

IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार, बीसीसीआयचा हिरवा कंदील; मोहम्मद शमी 'आऊट'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 12, 2024 01:26 PM IST

Rishabh Pant fit for IPL 2024 : अपघातामुळं गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या ऋषभ पंतला बीसीसीआयनं (BCCI) आयपीएल खेळण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

IPL 2024 : ऋषभ पंतला बीसीसीआयचा हिरवा कंदील, शमी स्पर्धेतून बाहेर
IPL 2024 : ऋषभ पंतला बीसीसीआयचा हिरवा कंदील, शमी स्पर्धेतून बाहेर

Rishabh Pant fit for IPL 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या चाहत्यांना खूषखबर दिली आहे. बीसीसीआयनं ऋषभ पंतला आयपीएल (IPL 2024) खेळण्यासाठी मंजुरी दिली आहे. ऋषभ पंत फिट असल्याचा निर्वाळा बीसीसीआयनं दिला आहे. मात्र, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा हे स्पर्धेबाहेर गेले आहेत.

आयपीएल २०२४ च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं काही खेळाडूंच्या फिटनेसबाबत माहिती दिली आहे. ऋषभ पंत हा पूर्णपणे फिट असून तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्पर्धेत खेळेल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. ऋषभच्या कारला ३० डिसेंबर २०२२ रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ भीषण अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. तब्बल १४ महिन्यांच्या उपचारानंतर तो पुन्हा फिट झाला आहे. 

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्या डाव्या प्रॉक्सिमल क्वाड्रिसेप्स टेंडनवर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी शस्त्रक्रिया झाली. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यांच्या फिटनेसवर काम केलं जाईल. मात्र, तो आयपीएल २०२४ मध्ये भाग घेऊ शकणार नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या उजव्या टाचेवर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या बीसीसीआयचं वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याला आयपीएलच्या आगामी स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे.

टी-२० विश्वचषकासाठी ऋषभवर लक्ष

ऋषभ पंत हा २०२४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील दावेदारांपैकी एक आहे. मात्र, यासाठी त्याला आयपीएलमध्ये कामगिरी करावी लागणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. तर, शमी हा भारतात खेळल्या जाणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

WhatsApp channel