IND vs AUS: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारताला या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जर या खेळाडूंनी या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही तर बीसीसीआय कठोर पावले उचलू शकते. अशा तऱ्हेने भारतीय कर्णधार रोहित शर्मावरही टांगती तलवार आहे. रोहित शर्मा संघाबाहेर गेला तर कसोटी संघाचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशातच टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भारताचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतचे नाव सुचवले आहे.
मोहम्मद कैफने कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी ऋषभ पंतचे नाव का सुचवले. त्यामागचे कारणही सांगितले आहे. ‘पंत हा सध्याच्या संघातील एकमेव खेळाडू आहे जो कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे, असे त्याचे मत आहे. कैफने इन्स्टाग्राम लाईव्हवर म्हटले की, ‘सध्या भारतीय संघातून फक्त ऋषभ पंत कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे. तो याला पात्र आहे, प्रत्येक वेळी तो खेळला आहे, त्याने भारतीय संघाला पुढे ठेवले आहे. तो कोणत्याही क्रमांकावर खेळायला आला तरी मॅच विनिंग इनिंग खेळण्यासाठी तो तयार असतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका अशा सर्व प्रकारच्या परिस्थितीत त्याने धावा केल्या आहेत. सीमिंग असो किंवा टर्निंग ट्रॅक, तो एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे.’
‘रिषभ पंत जेव्हा आपला शेवटचा कसोटी सामना खेळेल, तेव्हा तो दिग्गज म्हणून निवृत्ती घेईल. त्याने आपल्या कीपिंगमध्ये बरीच सुधारणा झाल्याचे त्याने यापूर्वीच दाखवून दिले आहे. जोपर्यंत तो क्रीजवर होता, तोपर्यंत न्यूझीलंडचा संघ दबावात होता. त्यामुळे सध्याच्या खेळाडूंपैकी जर तुम्ही भावी कर्णधाराच्या शोधात असाल तर रिषभ पंत रोहित शर्माचा उत्तराधिकारी होण्यास पात्र आहे, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये’, असेही मोहम्मद कॅफ यांनी म्हटले आहे.