दिल्ली प्रीमियर लीग २०२४ चा पहिला सामना शनिवारी (१७ ऑगस्ट) पुरानी दिल्ली ६ आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांकडून स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली.
पण या सामन्यात चर्चा मिळवली ती ऋषभ पंतच्या गोलंदाजीने. पुरानी दिल्ली ६ चा कर्णधार ऋषभ पंतने या सामन्यात गोलंदाजी केली. पंतची गोलंदाजी पाहून सोशल मीडियवर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. बऱ्याच चाहत्यांनी हा टीम इंडियाचा नवा हेड कोच गौतम गंभीरचा प्रभाव असल्याचे म्हटले आहे.
जेव्हा चाहत्यांनी विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला गोलंदाजी करताना पाहिलं, तेव्हा ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. पंत सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता.
मात्र, पंतच्या षटकाने सामन्याच्या निकालावर काहीही फरक पडला नाही. कारण जेव्हा तो गोलंदाजीला आला तेव्हा, दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सला विजयासाठी ६ चेंडूत फक्त १ धाव हवी होती. पंतच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सला विजय मिळाला.
ऋषभ पंतची गोलंदाजी पाहून चाहत्यांना गौतम गंभीरचा प्रभाव दिसला. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे या कारणासाठी खूप प्रसिद्ध आहेत की तो फलंदाजांनाही गोलंदाजी करायला लावतात. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव सामन्याचे शेवटचे षटक टाकताना दिसले. हे लक्षात घेऊन चाहत्यांना ऋषभ पंतची गोलंदाजी पाहताना गंभीर इफेक्ट आठवला.
दिल्ली प्रीमियर लीग टी-20 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पुरानी दिल्ली ६ ने २० षटकात ३ बाद १९७ धावा केल्या. त्यांच्याकडून अर्पित राणाने ४१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा करत संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने १९.१ षटकांत १९८/७ धावा करून विजय मिळवला. संघाचा कर्णधार आयुष बडोनी आणि सलामीवीर प्रियांश आर्यने ५७-५७ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.