भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया सध्या चांगलाच घाम गाळत आहे.
या दरम्यान, काही खेळाडू मस्तीच्या मूडमध्येही दिसले. ऋषभ पंत सहसा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण यावेळी त्याने गोलंदाजीत हात आजमावला आहे. त्याने जसप्रीत बुमराहला बाउन्सर टाकण्याचाही प्रयत्न केला.
बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ऋषभ पंतने गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलला विचारले की बुमराहला आऊट केले आहे की नाही?
त्यानंतर बुमराह म्हणतो की, ऋषभची बॉलिंग ॲक्शन हाशिम आमलासारखी आहे. ऋषभ आणि बुमराह यांच्यातील वादविवाद रंजक होता कारण एकीकडे बुमराहने दावा केला होता की तो बाद होणार नाही. तर दुसरीकडे, पंतने सांगितले की, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक विकेट घेतली आहे.
यावेळी ऋषभ पंतने फुल लेंथचे २-३ चेंडू टाकले, जे बुमराहने सहज खेळले. पण जेव्हा पंतने बाउन्सर टाकला, तेव्हा बुमराहने जबरदस्त पुल शॉट मारला. हा शॉट खूप शक्तिशाली होता. बुमराहच्या मते हा षटकार होता, तर पंत म्हणाला, नाही हे झेलबाद आहे. यानंतर पंत मॉर्नी मॉर्केलला विचारायला गेला असता त्याने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.
ऋषभ पंतने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले असून ६२.४० च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहकडे पाहिले तर त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात ७ सामने खेळून ३२ विकेट घेतल्या आहेत.