इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाचा बिगुल वाजला आहे. आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे होणार आहे. मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गेल्या मोसमातील विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवले आहे. मात्र, केकेआरने आपला कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघ नवीन कर्णधारासह आयपीएल २०२५ मध्ये प्रवेश करेल. रिपोर्टनुसार, केकेआरने आपल्या नवीन कर्णधाराचे नाव निश्चित केले आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर केकेआर आता रिंकू सिंगकडे कमान सोपवणार आहे.
रिंकू केकेआरचा नवा कर्णधार असेल आणि आयपीएल २०२५ मध्ये श्रेयस अय्यरची जागा घेईल. मात्र, केकेआरने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
रिंकू सिंग गेल्या मोसमापर्यंत ५५ लाख रुपयांमध्ये केकेआरचा भाग होता. शेवटच्या ५ चेंडूत ५ षटकार मारून सामना जिंकणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. यावेळी म्हणजेच आयपीएल २०२५ साठी कोलकाताने रिंकू सिंगला १३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांना आयपीएल २०२५ साठी रिेटेन केले आहे. केकेआरने ४ कॅप्ड खेळाडू आणि २ अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले. रिंकू सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने १३ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
वरुण चक्रवर्तीला १२ कोटी, सुनील नरेनला १२ कोटी, आंद्रे रसेलला १२ कोटी, हर्षित राणाला ४ कोटी आणि रामनदिन सिंगला ४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने ६ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी १२० कोटींपैकी ५७ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता IPL २०२५ च्या मेगा लिलावात KKR कडे ६३ कोटी रुपये असतील.