team india t20 world cup squad : आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर झाला आहे. बीसीसीआयने एकूण १५ खेळाडूंची निवड केली आहे. एवढेच नाही तर ४ खेळाडू राखीव म्हणून संघासोबत जाणार आहेत.
पण टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघात रिंकू सिंगची निवड झाली नाही. या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. रिंकूची निवड न झाल्याने केवळ चाहतेच नाही तर अनेक क्रिकेट तज्ज्ञही हैराण झाले आहेत. रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.
पण आता रिंकू सिंगचे वडील खानचंद्र सिंग यांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत रिंकू सिंगच्या वडिलांनी सांगितले की, “खूप अपेक्षा होत्या आणि त्यामुळेच थोडे दु:ख आहे. आम्ही मिठाई आणि फटाकेही आणले होते आणि रिंकू प्लेइंग इलेव्हनमध्ये राहील असा विचार करत होतो. त्याचे (रिंकू) मन दुखले आहे. त्याच्या आईशी बोलताना सांगितले की त्याचे नाव ११ किंवा १५ खेळाडूंमध्ये नाही, पण तरीही तो संघासोबत जात आहे”.
रिंकू सिंगची निवड न झाल्याने लोक निराश झाले आहेत कारण २०२३ मध्ये पदार्पण केल्यानंतर, रिंकूने भारतासाठी १५ T20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ८९ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत.
पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रिंकू सिंग भारतासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षी, त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतील २ सामन्यांमध्ये जलद ८२ धावा केल्या, ज्यामध्ये ६८ धावांची झंझावाती खेळी देखील समाविष्ट होती.
त्यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ डावात ५२.५ च्या उत्कृष्ट सरासरीने १०५ धावा केल्या होत्या. हा उत्कृष्ट फॉर्म असूनही त्याला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच्यासोबत शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांना टी-20 विश्वचषक २०२४ साठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.
T20 विश्वचषक २०२४ साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, ए. पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.
संबंधित बातम्या