बहुप्रतिक्षित दुलीप करंडक स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या दुलीप ट्रॉफीतील सुरुवातीच्या फेरीसाठी ४ संघांची घोषणादेखील करण्यात आली. पण या चारही संघात संजू सॅमसन आणि रिंकू सिंग या गुणी खेळाडूंना स्थान मिळाले नाही, त्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले.
पण आता रिंकू सिंग याने त्याला दुलीप ट्रॉफीच्या प्राथमिक फेरीत स्थान का मिळाले नाही, याचे कारण सांगितले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी न करणे, हे दुलीप ट्रॉफीसाठी निवड न होण्याचे मुख्य कारण असल्याचे रिंकूने सांगितले.
माध्यमांशी बोलताना रिंकू सिंगने खुलासा केला, “काहीही नाही. देशांतर्गत मोसमात माझी कामगिरी चांगली झाली नाही. मी रणजी ट्रॉफीमध्ये चांगला खेळलो नाही. मी फक्त २-३ सामने खेळलो. मी चांगला खेळ केला नाही म्हणून माझी निवड झाली नाही. माझी पुढील फेरीसाठी निवड होऊ शकते".
रिंकू सिंग याचा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील रेकॉर्ड शानदार राहिला आहे. त्याने आतापर्यंत ४७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७१.५९ च्या स्ट्राइक रेटने ३१७३ धावा केल्या आहेत. या काळात डावखुऱ्या फलंदाजाने ७ शतके आणि २० अर्धशतके झळकावली.
यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंची दुलीप ट्रॉफी २०२४ साठी निवड झाली आहे. या खेळाडूंसाठी दुलीप ट्रॉफीचे सामने खूप महत्त्वाचे ठरू शकतात कारण भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी दुलीप ट्रॉफी खेळाडूंसाठी एक आदर्श व्यासपीठ ठरू शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी १९ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये आणि दुसरी कसोटी २७ सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये होणार आहे.