बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याआधीच रिकी पाँटिंगनं केलं भाकीत, भारतीय खेळाडूचंही घेतलं नाव
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याआधीच रिकी पाँटिंगनं केलं भाकीत, भारतीय खेळाडूचंही घेतलं नाव

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याआधीच रिकी पाँटिंगनं केलं भाकीत, भारतीय खेळाडूचंही घेतलं नाव

HT Marathi Desk HT Marathi
Nov 06, 2024 02:09 PM IST

Ricky Ponting on BGT : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा निकाल आणि खेळाडूंविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानं भाकीत केलं आहे.

रिकी पाँटिंग
रिकी पाँटिंग (AFP)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धा जवळ आल्यामुळं त्याबाबतची चर्चाही जोर धरू लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानं या मालिकेबद्दल एक भाकीत केलं आहे.

बॉर्डर-गावस्कर मालिकेत सर्वाधिक धावा करू शकणाऱ्या संभाव्य दोन खेळाडूंची नावं पाँटिंगनं सांगितली आहेत. त्यात एका भारतीय आणि एका ऑस्ट्रेलियन खेळाडूचा समावेश आहे. रिषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ हे ते दोन खेळाडू आहेत.

आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना रिकी पाँटिंगनं या संदर्भात भाष्य केलं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये रिषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ टॉप स्कोअरर असू शकतात, असं त्यानं म्हटलं आहे. रिषभ पंतला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे, तर स्टीव्ह स्मिथ आधीच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू आहे आणि तो स्वत:ला पुरता ओळखून आहे. स्मिथ पहिल्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर परतला आहे. त्याच्याकडं अजून बरंच काही सिद्ध करण्यासारखं आहे. चौथ्या क्रमांकावर तो सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, हे त्यांना सिद्ध करावं लागेल, असं पाँटिंग म्हणाला.

'रिषभ पंत संघात पुनरागमन करतोय. तो मधल्या क्रमांकावर खेळणार आहे. या क्रमांकावर फलंदाजीला येईपर्यंत चेंडूची चमक आणि कडकपणा थोडा कमी झालेला असतो. अशा परिस्थितीत त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल, असा विश्वास पाँटिंग यानं व्यक्त केला.

मालिका कोण जिंकणार?

ही मालिका कोण जिंकणार याचा अंदाजही रिकी पाँटिंगनं वर्तवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया ३-१ असा विजय मिळवेल, असं त्याचं म्हणणं आहे. भारताच्या गोलंदाजीबद्दल पाँटिंग म्हणाला, 'मोहम्मद शमीच्या उपस्थिती वा अनुपस्थितीमुळं भारतीय गोलंदाजीत फरक पडेल. प्रत्येक कसोटी सामन्यात २० विकेट्स मिळवणं हे भारतासाठी सर्वात मोठं आव्हान असेल. भारताची फलंदाजी चांगली होईल, परंतु गोलंदाजीत अडचण होईल. भारताकडे सध्या एकच अनुभवी वेगवान गोलंदाज आहे, जसप्रीत बुमराह. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही गोलंदाज अशा लयीत दिसत नाही, असं तो म्हणाला.

Whats_app_banner