इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची पंजाब किंग्जसंघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्ससंघाशी फारकत घेतल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी पंजाब किंग्जने त्याच्यावर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली.
पंजाब किंग्जसंघात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना पाँटिंग म्हणाला की, 'मला नवे मुख्य प्रशिक्षक होण्याची संधी दिल्याबद्दल मी पंजाब किंग्जचा आभारी आहे. नवे आव्हान स्वीकारण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही सर्व जण वर्षानुवर्षे फ्रँचायझीसोबत राहिलेल्या चाहत्यांची परतफेड करू इच्छितो आणि वचन देतो की, त्यांना आयपीएल २०२५ मध्ये वेगळा पंजाबचा संघ पाहायला मिळेल.
पंजाबच्या संघाने गेल्या सात हंगामात सहाव्यांदा मुख्य प्रशिक्षक बदलला आहे. पंजाबने आयपीएलच्या इतिहासात केवळ दोनवेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या १० वर्षांत त्यांना एकदाही प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात पंजाबचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता.
आयपीएल २०२५ च्या मेगालिलावापूर्वी पाँटिंगची पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब किंग्ज पुढील हंगामासाठी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवू इच्छित आहे, हे येत्या काही दिवसातंच स्पष्ट होईल. या स्पर्धेत शिखर धवन पंजाबचे नेतृत्व करेल की, त्याऐवजी दुसऱ्या कोणत्या खेळाडूवर संघाजी जबाबदारी सोपवली जाईल, याबाबत लवकरच पजाबचा संघ घोषणा करेल.
पंजाबकडून गेल्या मोसमात दुसऱ्यांदा पर्पल कॅप मिळवणारा हर्षल पटेल आणि शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा या अनकॅप्ड पॉवर हिटिंग जोडीचा समावेश आहे. त्यांच्याकडे भारताचा टी-२० विश्वचषक विजेता डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा देखील आहेत, ज्यांनी गेल्या मोसमात काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. पीबीकेएसकडे इंग्लंडचा सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हे परदेशी पर्याय आहेत.
तीन वेळा वनडे विश्वचषक जिंकणारा पाँटिंग पाच वर्षांच्या अंतराने फक्त दोनवेळा आयपीएलमध्ये खेळला. २००८ मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आणि २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून स्पर्धेत पुनरागमन केले. मोसमाच्या मध्यातच त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि रोहित शर्माचा कर्णधारपदाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर त्याच वर्षी त्याने सर्व फॉर्मेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली. परंतु, २०१५ आणि २०१६ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्यापूर्वी २०१४ मध्ये सल्लागार भूमिकेत एमआयशी जोडला होता.
२०१८ मध्ये, पाँटिंगला दिल्ली फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले. दिल्लीच्या संघाने २०१९ ते २०२१ दरम्यान सलग तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान पटकावले. दिल्लीच्या संघाने २०२० मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. मात्र, तिथे त्यांना चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला.