भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (२४ सप्टेंबर) इराणी चषक २०२४ साठी मुंबई आणि शेष भारताच्या संघांची घोषणा केली. संघ जाहीर होताच यातील खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कारण त्यात बांगलादेशविरुद्ध निवडलेल्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. आता त्यांना इराणी चषकात खेळण्यास सांगितले आहे. यातील सरफराज खान हा मुंबईकडून खेळणार आहे. तर ध्रुव जुरेल आणि यश दयाल हे शेष भारतकडून खेळणार आहेत.
विशेष म्हणजे, ऋतुराज गायकवाड याची 'रेस्ट ऑफ इंडिया'च्या कर्णधारपदी निवड झाली. ऋतुराज गायकवाडचे चाहत्यांच्या मते, ऋतुराजची बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघात निवड व्हायला हवी होती, त्यामुळे ते सतत ऋतुराज गायकवाडवर अन्याय झाल्याचे सोशल मीडियावर बोलत राहतात. पण आता ऋतुराजची दुलीप ट्रॉफीनंतर ईराणी चषकातही कर्णधारपदी निवड करून त्याच्या चाहत्यांना आनंद व्यक्त करण्याची संधी दिली आहे.
दरम्यान, या स्पर्धेत अजिंक्य रहाणे हा मुंबईचा कर्णधार असेल. हा सामना १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
अलीकडेच, सरफराज खानबद्दल अशी अटकळ बांधली जात होती, की त्याला टीम इंडियाच्या संघातून वगळून मुंबई संघात पाठवले जाऊ शकते. आता हे दावे पूर्णपणे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. सरफराजशिवाय त्याचा भाऊ मुशीर खानही मुंबई संघात खेळणार आहे. ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही, कारण ते दोघेही शेष भारत संघाकडून खेळणार आहेत.
इराणी चषक १९६० मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून ही स्पर्धा भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग बनली आहे. इराणी कपमध्ये फक्त एकच सामना खेळला जातो, ज्यामध्ये गतविजेत्या रणजी चॅम्पियन्सचा सामना 'रेस्ट ऑफ इंडिया'शी होतो. शेष भारत संघात इतर राज्यातील खेळाडू एकत्र येऊन एकाच संघात खेळतात. मुंबई हा सध्याचा रणजी चॅम्पियन असल्याने त्याचा सामना शेष भारतशी होणार आहे.
मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, सरफराज खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेंडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मुशीर खान, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस.
शेष भारत संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद. , राहुल चहर.