भारतीय क्रिकेट संघाचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आज शनिवारी (२४ ऑगस्ट) अचानक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करताना धवनने आपल्या शानदार कारकिर्दीला निरोप दिला.
त्याने आपले मार्गदर्शक, सहकारी, चाहते, दिल्ली आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे आभार मानून निवृत्तीची घोषणा केली. धवनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ६३२ दिवसांपूर्वी १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता.
निवृत्तीची घोषणा करताना तो म्हणाला, भारतासाठी खेळण्याचे माझ्या मनात नेहमीच ध्येय होते आणि अनेक लोकांमुळे मी हे स्थान गाठले. सर्वप्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा आणि मदन शर्मा... त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेट शिकलो. त्यानंतर माझी संपूर्ण टीम ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो... प्रसिद्धी,सर्वांचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला.
कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात. त्यामुळे मी तेच करत आहे, मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे.
तो पुढे म्हणाला, आता जेव्हा मी माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देत आहे, तेव्हा मला समाधान आहे की मी माझ्या देशासाठी खूप खेळलो. मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसीए (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन) यांचा आणि माझ्या सर्व चाहत्यांचे प्रेम आणि समर्थनासाठी खरोखर आभारी आहे.
मी स्वत:ला एवढेच सांगतो की, तू पुन्हा तुझ्या देशासाठी खेळू शकणार नाहीस यामुळे दु:खी होऊ नकोस, पण तू तुझ्या देशासाठी खेळलास याचा नेहमी आनंद साजरा कर. आणि मी खेळलेली ही माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे.
शिखर धवन बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपडत होता, पण शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल या युवा सलामीवीरांच्या आगमनाने त्याचे पुनरागमन कठीण झाले होते.
दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाला आगामी आयसीसी स्पर्धा लक्षात घेऊन युवा खेळाडूंना तयार करायचे आहे. त्यामुळेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
शिखर धवनला माहित होते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे त्याच्यासाठी क्वचितच शक्य आहे. तो देशांतर्गत क्रिकेट खेळत नव्हता आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी त्याची कामगिरी काही खास नव्हती. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब संघ त्याला सोडण्याची शक्यता आहे. यामुळेच शिखर धवनने आपली बॅट मॅन करण्याचा निर्णय घेतला.
शिखर धवनने १६ मार्च २०१३ रोजी कसोटी पदार्पणात अनेक विक्रम मोडीत काढले. कसोटी पदार्पणातच खेळाडूने फक्त ८५ चेंडूत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला.
२०१३ आणि २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डाव्या हाताच्या फलंदाजाला 'मिस्टर आयसीसी' असे टोपणनाव देण्यात आले. २०१५ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत धवन भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
त्याने १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि ४४.११ च्या सरासरीने आणि ९१.३५ च्या स्ट्राइक रेटने ६७९३ धावा केल्या, ज्यात ७ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याने ६८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आणि ११ अर्धशतकांसह २७.९२ च्या सरासरीने आणि १२६ च्या स्ट्राइक रेटने १७५९ धावा केल्या. ३४ कसोटी सामन्यांमध्ये धवनने ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या.