रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) महिला प्रीमियर लीग २०२४ चे (WPL 2024) विजेतेपद जिंकले आहे. WPL च्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.
दिल्ल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकात ११५ धावा करत सामना जिंकला.
आरसीबीचा पुरुष संघ आयपीएलमध्ये तीनदा फायनलमध्ये पोहोचला होता. पण प्रत्येकवेळी त्यांच्या नशिबी पराभवच आला. यामुळे सोशल आरसीबीला प्रचंड ट्रोल केले जाते. पण आता आरसीबीच्या महिला संघाने कमाल करत पहिली वहिली ट्रॉफी जिंकली आहे.
दरम्यान, या सामन्यात आरसीबीसमोर ११४ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य संघाने २ फलंदाज गमावून केवळ १९.३ षटकात पूर्ण केले. संघाकडून एलिस पेरीने नाबाद ३५, सोफी डिव्हाईनने ३२ आणि स्मृती मानधनाने ३१ धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सकडून शिखा पांडे आणि मीनू मणी यांनी १-१ विकेट घेतली.
दिल्लीसाठी शेफाली वर्माने २७ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. तर कर्णधार मेग लॅनिंगने २३ धावा केल्या.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. संघाने ७ षटकात एकही विकेट न गमावता ६४ धावा केल्या होत्या. पण इथून फिरकीपटू सोफी मोलिनक्सने चमत्कार घडवला आणि पहिल्या ४ चेंडूत ३ विकेट घेत आरसीबीला सामन्यात परत आणले.
सर्वात आधी शेफाली (४४) सीमारेषेवर झेलबाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ॲलिस कॅप्सी शुन्यावर बोल्ड झाल्या. सोफी मोलिनक्सने दोघींना क्लीन बोल्ड केले. यानंतर चौथा धक्का ७४ च्या स्कोअरवर बसला. श्रेयंका पाटीलने कर्णधार मेग लॅनिंगला (२३) एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर आशा शोभनाने त्याच षटकात मारिजाने केप (८) आणि जेस जोनासेन (३) यांना बळी बनवले. या सततच्या धक्क्यांमुळे दिल्लीचा डा सावरू शकला नाही आणि ११३ धावांवर आटोपला.
आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने ४ आणि सोफी मोलिनेक्सने ३ बळी घेतले.