मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs SRH : २८७ धावा करूनही हैदराबादचा केवळ २५ धावांनी विजय, दिनेश कार्तिकच्या वादळी ८३ धावा

RCB vs SRH : २८७ धावा करूनही हैदराबादचा केवळ २५ धावांनी विजय, दिनेश कार्तिकच्या वादळी ८३ धावा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 15, 2024 06:55 PM IST

RCB Vs SRH IPL Highlights : आयपीएल २०२४ चा ३० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने २५ धावांनी विजय मिळवला.

RCB vs SRH Indian Premier League 2024
RCB vs SRH Indian Premier League 2024 (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ३० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) २५ धावांनी पराभव केला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने २८७ धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात आरसीबीनेही २६२ धावांपर्यंत मजल मारली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. 

प्रत्युत्तरात आरसीबीनेही शानदार फलंदाजी केली, परंतु लक्ष्य इतके मोठे होते की संघ २५ धावांनी मागे राहिला. आरसीबीला २० षटकात ७ विकेट्सवर केवळ २६२ धावा करता आल्या. दोन्ही संघांनी मिळून या सामन्यात एकूण ५४९ धावांचा पाऊस पाडला. 

आरसीबीकडून दिनेश कार्तिकने ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. तर कर्णधार डू प्लेसिसने २८ चेंडूत ६२ आणि विराट कोहलीने २० चेंडूत ४२ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने ४३धावांत ३ बळी घेतले. तर मयंक मार्कंडेयने २ आणि टी नटराजनने १ बळी घेतला.

आरसीबी वि. हैदराबाद क्रिकेट स्कोअर

दिनेश कार्तिक बाद

टी. नटराजनने दिनेश कार्तिकची विकेट घेत हैदराबादला सातवे यश मिळवून दिले. शानदार फलंदाजी करणारा कार्तिक ३५ चेंडूंत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आरसीबीला आता विजयासाठी ६ चेंडूत ४४ धावा करायच्या आहेत आणि विजयकुमार विशाक अनुज रावतसह क्रीजवर आहेत.

आरसीबीला पाचवा धक्का

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने शुन्यावर सौरव चौहानला बाद करून आरसीबीला पाचवा धक्का दिला. कमिन्सने त्याच षटकात डुप्लेसिसला बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर सौरवलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. महिपाल लोमरर सध्या दिनेश कार्तिकसह क्रीजवर आहे.

विराट कोहली बाद

 इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या मयंक मार्कंडेने विराट कोहलीला बाद करून हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असलेल्या कोहलीने पॉवरप्ले संपल्यानंतर लगेचच त्याची विकेट गमावली. २० चेंडूत ४२ धावा करून कोहली बाद झाला. 

तत्पूर्वी, डुप्लेसिस आणि कोहलीने आरसीबीला वेगवान सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेपर्यंत ७९ धावा केल्या, ही आयपीएल इतिहासातील पॉवरप्लेमधील सर्वोच्च कामगिरी होती, परंतु मार्कंडेने कोहलीला बाद करून ही भागीदारी तोडली.

आरसीबीची वेगवान सुरुवात

फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली या सलामीच्या जोडीने झंझावाती फलंदाजी करत आरसीबीला वेगवान सुरुवात करून दिली आणि ४ षटकांच्या अखेरीस धावसंख्या ५० धावा पार केली. ४ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या बिनबाद ५६ धावा आहे.

हैदराबादच्या २८७ धावा

सनरायझर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध शानदार फलंदाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या. हैदराबादने आयपीएलच्या याच मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावा केल्या होत्या, ही आयपीएलची सर्वोच्च धावसंख्या होती, पण या सामन्याच्या काही दिवसांनंतरच आपलाच विक्रम मोडला.

आरसीबीसाठी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ५२ धावांत २ बळी घेतले.

हेनरिक क्लासेनचे अर्धशतक

सनरायझर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध शानदार फलंदाजी सुरू ठेवत अवघ्या १५ षटकांत २०० धावांचा टप्पा पूर्ण केला. संघाचा फलंदाज हेनरिक क्लासेनने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १५ षटकं संपल्यानंतर हैदराबादची धावसंख्या दोन बाद २०५ धावा आहे.

हेड पॅव्हेलियनमध्ये परतला

आरसीबीचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बाद करून सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का दिला. हेड ४१ चेंडूंत ९ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०२ धावा करून बाद झाला. यासह क्लासेन आणि हेड यांच्यातील ५७ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

ट्रेव्हिस हेडचं ३९ चेंडूत शतक

सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आपली शानदार खेळी सुरू ठेवत आरसीबीविरुद्ध ३९ चेंडूत शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासातील हे चौथे जलद शतक आहे. हैदराबादने अवघ्या ६८ चेंडूत १५० धावांचा आकडा पूर्ण केला. १२वे षटक संपल्यानंतर हैदराबादची धावसंख्या एका विकेटवर १५८ धावा झाली आहे. 

हेड ४० चेंडूत १०२ धावांवर तर हेनरिक क्लासेन १० चेंडूत १५ धावांवर खेळत आहे. आयपीएलच्या चालू मोसमातील हे चौथे शतक आहे. क्लासेन आणि हेड यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे.

ट्रॅव्हिस हेडचे २० चेंडूत अर्धशतक

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी करत अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हेडने अभिषेक शर्माच्या साथीने हैदराबादला झंझावाती सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांच्या वेगवान खेळीच्या जोरावर हैदराबादने पॉवरप्ले संपल्यानंतर बिनबाद ७६ धावा केल्या आहेत. सध्या हेड २१ चेंडूत ५२ धावा आणि अभिषेक शर्मा १५ चेंडूत २३ धावा करत खेळत आहे.

हेड आणि अभिषेक शर्माची तुफानी सुरुवात

सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आरसीबीविरुद्ध वेगवान सुरुवात केली आणि अवघ्या ५ षटकांत संघाची धावसंख्या ५० च्या पुढे नेली. हेड सध्या १६ चेंडूत ३३ धावांवर तर अभिषेक १४ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विषक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटीकपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

आरसीबीने टॉस जिंकला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी आरसीबीने ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली आहे. लॉकी फर्ग्युसन आरसीबीकडून या सामन्यात खेळणार आहे.

तर सनरायझर्स हैदराबादने संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबी आणि हैदराबाद हेड टू हेड

आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाले दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. यापैकी बंगळुरूने १० आणि हैदराबादने १२ सामने जिंकले आहेत. 

तर चिन्नास्वामी येथे या दोघांमध्ये ८ सामने खेळले गेले आहेत. यापैकी बेंगळुरूने ५ आणि हैदराबादने २ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

आरसीबी-हैदराबाद गेल्या ५ सामन्यातील आकडेवारी

उभय संघांमध्ये झालेल्या गेल्या ५ सामन्यांपैकी बंगळुरूने ३ आणि हैदराबादने २ जिंकले आहेत. बेंगळुरूने गेल्या दोन सामन्यांमध्ये हैदराबादचा पराभव केला असून डुप्लेसिसचा संघ या सलग तिसरा विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल.

पिच रिपोर्ट

चिन्नास्वामीच्या खेळपट्टीमध्ये थोडासा बदल झाला आहे, सध्या पीच किंचित दुटप्पी आहे. आयपीएल २०२१ नंतर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९०.८ वरून १८० वर आली आहे. या बदलामुळे सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये फलंदाजांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

IPL_Entry_Point