IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाईल. हा सामना २९ मार्च रोजी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बंगळुरू आणि कोलकाताने आपपल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे.गेल्या सामन्यात एकीकडे केकेआरने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. तर, दुसरीकडे आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. दरम्यान, बंगळरू आणि कोलकाता यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू यांच्यात आतापर्यंत ३२ सामने खेळले गेले. यापैकी १८ सामन्यात कोलकात्याने आरसीबीला पराभूत केले आहे. तर, आरसीबीने कोलकात्याविरुद्ध १४ सामने जिंकले आहेत. आकडेवारीनुसार, कोलकाता नाईट रायडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर वरचष्मा दिसत आहे.
आयपीएलमध्ये कोलकात्याची आरसीबीविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २२२ धावा आहे. तर, बंगळुरूची केकेआरविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २१३ धावा आहे. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ज्या संघाने आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळला आहे, त्याच संघाने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत आरसीबी संघ हा सामना देखील जिंकू शकतो. कारण हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर होणार आहे.
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम फलंदाजांसाठी अनुकूल असून येथे धावांचा पाऊस पाहायला मिळतो. सपाट खेळपट्टीमुळे फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक मदत मिळते. या मैदानावर आरसीबी आणि केकेआर ११ वेळा भिडले आहेत. त्यापैकी कोलकाताने ७ सामने जिंकले आहेत. तर, आरसीबीला फक्त चार सामने जिंकता आले आहेत.