RCB vs DC Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगचा सातवा सामना आज (२९ फेब्रुवारी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्लीने प्रथम फलंदाजी १९५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरुला २० षटकात ९ बाद १६९ धावाच करता आल्या. अशा प्रकारे दिल्लीने २५ धावांनी सामना जिंकला.
१९६ धावांचा पाठलाग करताना आरसीबीने धमाकेदार सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८ षटकात ८५ धावांची भागिदारी केली. पण स्मृती मानधना आऊट झाल्यानंतर संघाला गळती लागली.
आरसीबीकडून केवळ कर्णधार स्मृती मानधना हिने ४३ चेंडूत ७४ धावा केल्या. पण इतर फलंदाजांची साथ तिला लाभली नाही. त्यामुळे एकवेळ आरसीबी हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते, पण शेवटी संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
दिल्लीकडून मारीजेन कॅप आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर जेस जोनासेनने ३ विकेट घेतल्या.
टॉस गमावून प्रथम फलंदाजीस आलेल्या दिल्लीने या मोसमातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, दोघींमधील २८ धावांची भागीदारी पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संपुष्टात आली. सोफी डेव्हाईनने कर्णधार लॅनिंगला बाद केले. मेग लॅनिंगने १७ चेंडूत ११ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एलिस कॅप्सीने शेफाली वर्मासह डाव सावरला. दोघींमध्ये ८२ धावांची मोठी भागीदारी झाली.
पण १२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयंका पाटीलने शेफालीला बाद केले. शेफालीने शानदार अर्धशतक ठोकले. तिचे यंदाचे दुसरे अर्धशतक आहे. तीन चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तिने ३१ चेंडूत ५० धावा काढल्या.
त्याचवेळी ॲलिस कॅप्सीनेही ४६ धावांची शानदार खेळी केली. तर मारिजेन कॅपने तुफानी फलंदाजी करताना १५ चेंडूत ३२ धावा केल्या. ती १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सिमरन बहादूरकरवी सोफी डिव्हाईनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.
याशिवाय जेस जोनासनने १६ चेंडूत ३६ धावांची नाबाद खेळी खेळली. आरसीबीकडून सोफी डेव्हाईन आणि नॅडिन डी क्लार्कने प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले. त्याचवेळी श्रेयंका पाटीलला एक विकेट मिळाली.
संबंधित बातम्या