WPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा पाचवा सामना खेळला गेला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने सलग दुसरा विजय मिळवला. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील संघाने गुजरातचा ८ गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. या लाईव्ह सामन्यात एका चाहत्याने आरसीबीची स्टार युवा खेळाडू श्रेयंका पाटीलला थेट लग्नाची मागणी घातली.
सामन्यादरम्यान आरसीबीच्या श्रेयंकासाठी एक चाहता लग्नाचा प्रस्ताव घेऊन मैदानात पोहोचला. स्टँडवर बसलेल्या या चाहत्याच्या हातात एक पोस्टर दिसत आहे. त्यावर लिहिले होते की, "श्रेयंका, तू माझ्याशी लग्न करशील का?" आरसीबीच्या डावातील सातव्या षटकात हा प्रकार समोर आला. टीव्ही स्क्रीनवर हा चाहता दिसताच डगआऊटमध्ये बसलेले आरसीबीचे खेळाडूही हसायला लागले.
या स्पर्धेत श्रेयंका पाटीलला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आली नाही. यूपीविरुद्ध सामन्यात तिच्या बॅटमधून फक्त आठ धावा आल्या. गोलंदाजी करतानाही ती खूप महागडी ठरली. गुजरातविरुद्धच्या सामन्यात २१ वर्षीय गोलंदाजाची अशीच कामगिरी पाहायला मिळाली. तिला एकही विकेट घेता आली नाही. तिने गेल्या दोन सामन्यात फक्त एक विकेट घेतली.
गुजरातविरुद्ध सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात विकेट गमावत १०७ धावा केल्या. आरसीबीने १२.३ षटकात हा सामना ८ विकेटने जिंकला. आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधनाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याने २७ चेंडूंचा सामना करत २७ चौकार मारले. मानधनाच्या डावात एका षटकाराचाही समावेश होता. मेघनाने २८ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. एलिस पेरीने १४ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. त्याने चार चौकार मारले. सोफी डिव्हाईन सहा धावा करून बाद झाली. ॲश्ले गार्डनर आणि तनुजा कंवर यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.