RCB Captain News: स्टार क्रिकेटपटू विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा महत्त्वाचा भाग आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून तो आरसीबीकडून खेळत आहे. कोहलीने २०१३ ते २०२१ पर्यंत आरसीबीचे नेतृत्व केले आहे. आयपीएल २०१५ च्या मेगा लिलावाआधी आता एक मोठी बातमी समोर येत आहे. कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो, अशी सुत्रांची माहिती आहे. आरसीबी फाफ डु प्लेसिस रिलीज करण्याची शक्यता आहे, ज्याने २०२२ ते २०२४ पर्यंत आरसीबीची धुरा संभाळली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरसीबी व्यवस्थापनासोबत नुकत्याच झालेल्या चर्चेत विराट कोहलीने पुन्हा नेतृत्व स्वीकारण्यात रस दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डु प्लेसिसने गेल्या तीन मोसमात आरसीबीचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने दोन मोसमात प्लेऑफपर्यंत मजल मारली. मात्र, डु प्लेसिसचे वय आता त्याच्या आड येत आहे. तो ४० वर्षांचा झाला आहे. याचदरम्यान कोहलीने कर्णधारपदाची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
आरसीबीच्या कर्णधारपदी कोहलीच्या पुनरागमनाबरोबरच फ्रँचायझी डु प्लेसिसला रिटेन करणार नसल्याचीही चर्चा आहे. सर्व फ्रँचायझीला ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला पाठवायची आहे. २०२१ मध्ये आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देताना कोहली म्हणाला होता की, ‘जोपर्यंत मी आयपीएलमध्ये माझा शेवटचा सामना खेळत नाही, तोपर्यंत मी आरसीबीचा खेळाडू राहीन. मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्यावर अढळ विश्वास ठेवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.'
महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाला एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आले नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी महेंद्र धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडे आहे. त्यांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच-पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकावी, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. यावर्षी आरसीबी कशी कामगिरी करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने १४३ आयपीएल सामने खेळले. आरसीबीने या कालावधीत ६० सामने जिंकले आहेत. तर, ७० सामने गमावले आहेत. तीन सामने बरोबरीत सुटले. तर, चार सामन्यांचा निकाल लागला नाही. आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीकडून सर्व हंगामात खेळणारा कोहली हा एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने २५२ सामन्यात ३८.६६ च्या सरासरीने ८,००४ धावा केल्या आहेत.