आयपीएल २०२५ साठी फक्त दोनच संघांनी ३ किंवा त्यापेक्षा कमी खेळाडूंना रिटेन केले आहे. विशेषत: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी केवळ विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या तिघांनाच रिटेन केले आहे.
रिटेन्शन जाहीर केल्यानंतर आरसीबीच्या ऑक्शन पर्समध्ये आता ८३ कोटी रुपये शिल्लक आहे. अशा स्थितीत त्यांना मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लावता येणार आहे.
आयपीएल २०२५ साठी तगडा संघ तयार करण्यासाठी RCB कोणत्या प्रसिद्ध आणि दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करू शकते, ते येथे आपण जाणून घेणार आहोत.
आरसीबीची रिटेन्शन लिस्ट पाहता यश दयालच्या रूपाने संघात प्रतिभावान वेगवान गोलंदाज असल्याचे स्पष्ट होते. पण संघाला अनुभवी वेगवान गोलंदाजाचीही गरज असेल, ज्यासाठी आरसीबी लिलावात भुवनेश्वर कुमारला लक्ष्य करू शकते. भुवीने आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी ११ विकेट घेतल्या होत्या. गेल्या मोसमात त्याला ४.२ कोटी रुपये मानधन मिळाले होते. खराब गोलंदाजीमुळे आरसीबीला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे भुवनेश्वरच्या आगमनाने संघाच्या गोलंदाजीला बळ मिळणार आहे. आयपीएलमध्ये भुवीचा इकॉनॉमी रेट फक्त ७.५६ आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आगामी हंगामात दोन स्फोटक टॉप ऑर्डर फलंदाजांचीही गरज भासणार आहे. गेल्या वर्षी आरसीबीने विल जॅकला ३.२ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. त्याने आयपीएल २०२४ मध्ये १७५.६ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना २३० धावा केल्या.
त्याच्याशिवाय, आयपीएल २०२४ मध्ये केकेआरसाठी चमकदार फलंदाजी करणारा फिल सॉल्ट देखील बेंगळुरू फ्रँचायझीचे लक्ष्य असू शकतो. फिल सॉल्टचे महत्त्व यावरून लक्षात येते की त्याने २०२४ मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये १,२१९ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२५ ची रिटेन्शन लिस्ट बाहेर येण्यापूर्वी, जेव्हा केएल राहुलला लखनऊ सुपर जायंट्समधून रीलीज होणार असल्याची चर्चा सुरू होती, तेव्हाच तो आरबीसीमध्ये जाऊ शकतो, असेही म्हटले जात होते. राहुलने २०१३ मध्ये आरसीबीमधूनच आयपीएल करिअरची सुरुवात केली होती.
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्समध्ये युझवेंद्र चहलला सर्वाधिक यश मिळाले आहे. या संघासाठी त्याने ११३ सामन्यात १३९ विकेट घेतल्या आहेत. २०२२ पासून राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या चहलला यावेळी राजस्थानने सोडले आहे. चहल आपल्या जुन्या संघात पुनरागमन करून कहर करू शकतो आणि त्याला कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा खूप अनुभव आहे.