टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्याने नुकतीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर जडेजा नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारी असल्याचे बोलले जात आहे.
जडेजा भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाला आहे. जामनगरची आमदार आणि रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजाने X वर ही माहिती पोस्ट केली.
रवींद्र जडेजा अनेकवेळा पत्नी रिवाबा जडेजासोबत प्रचार करताना दिसला आहे. त्याने त्याच्या पत्नीच्या प्रचारासाठी अनेक शोही केले आहेत. पण आता जड्डूने अधिकृतरित्या भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबा जडेजाने X वर याचा खुलासा केला आहे.
दरम्यान, रवींद्र जडेजाने टी-20 वर्ल्डकप २०२४ नंतर कोणताही सामना खेळलेला नाही. पण तो आता या महिन्यात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो. भारताने टी- विश्वचषक जिंकल्यानंतर जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा केला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जडेजाने दमदार कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ७४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने ४१ डावात ५१५ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये जडेजाने ५४ विकेट्सही घेतल्या आहेत.
रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ७२ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने १०५ डावात ३०३६ धावा केल्या. तसेच, या त्याने २० अर्धशतके आणि ५ शतके झळकावली आहेत. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद १७५ धावा धावा आहेत. एवढेच नाही तर त्याने कसोटीच्या १३६ डावात २९४ विकेट्ही घेतले आहेत.
टी-20 वर्ल्ड इंटरनॅशनलमधून नुकताच निवृत्त झालेला रवींद्र जडेजा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. जडेजाने २०२३ मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. जडेजा क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केल्यानंतर सक्रिय राजकारणात दिसू शकतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळताना दिसला होता.
सत्ताधारी पक्ष भाजपने २ सप्टेंबरपासून पक्षाची सदस्यत्व मोहीम सुरू केली. पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सर्व केंद्रीय मंत्री, अधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात झाली.