Ravichandran Ashwin Call Log Viral : टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, या मालिकेसाठी आर अश्विन देखील टीम इंडियाचा भाग होता, परंतु आतापर्यंत त्याला ३ पैकी केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली. अश्विनच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता अश्विन भारतात परतला आहे, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्याच्या कॉल हिस्ट्रीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
वास्तविक आर अश्विनने त्याच्या X अकाउंटवर त्याच्या कॉल हिस्ट्रीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात त्याने दाखवले की निवृत्तीनंतर त्याला कोणी-कोणी कॉल केले. निवृत्ती घोषित केल्यानंतर माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनीही अश्विनला फोन केल्याचे या फोटोत दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना अश्विनने लिहिले की, ''जर मला २५ वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते की माझ्याकडे एक स्मार्ट फोन असेल आणि भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसाचा कॉल लॉग असा दिसला असता, तर मला हार्ट अटॅक आला असता. धन्यवाद.."
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला गेला, या पिंक बॉल डे-नाईट टेस्टमध्ये अश्विनची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड झाली.
या सामन्यात अश्विनला फक्त १ विकेट घेता आली, याशिवाय टीम इंडियाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
संबंधित बातम्या