भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने गुंतवणुकीच्या जगात मोठा डाव खेळला आहे. अश्विनने २०२३ पासून सुरू झालेल्या ग्लोबल चेस लीगमध्ये एन्ट्री घेतली आहे. अश्विनने अमेरिकन गॅम्बिट्स या नवीन फ्रँचायझीचे सह-मालकत्व संपादन केले आहे.
या लीगने सोमवारी सर्व ६ संघांची घोषणा केली आणि सांगितले की ग्लोबल चेस लीगचा (GCL) दुसरा सीझन लंडनमध्ये ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान खेळला जाईल.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अश्विन म्हणाला, की बुद्धिबळ जगतात अमेरिकन गॅम्बिटच्या प्रवेशाने आम्ही उत्साहित आहोत. आम्ही धोरणात्मक प्रतिभा आणि दृढनिश्चय यांच्या मिश्रणासह गेमची पुनर्व्याख्या करण्यावर लक्ष केंद्रित करू. एक सह-मालक या नात्याने, ही फ्रँचायझी यशाची नवीन उंची कशी गाठते हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे".
ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या सीझनमध्ये चिंगारी गल्फ टायटन्सची जागा अमेरिकन गँबिट्सने घेतली आहे. अल्पाइन एसजी पायपर्स, पीबी जी अलास्कन नाइट्स, गँगिस ग्रँडमास्टर्स, मुंबा मास्टर्स आणि त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स अशी उर्वरित ५ संघांची नावे आहेत.
त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स जीसीएलच्या पहिल्या सत्रातील विजेता संघ होता, ज्याने अंतिम फेरीत मुंबा मास्टर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने बुद्धिबळाचा खेळ पुढे नेण्यात रवी अश्विनच्या योगदानाबद्दल सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला. आनंदने लिहिले, की “बुद्धिबळाच्या जगात एक नवीन प्रवास सुरू केल्याबद्दल रविचंद्रन अश्विनचे अभिनंदन. तु क्रिकेटमधील महान खेळाडूंनाही बाद केले आहे आणि मला आशा आहे की अमेरिकन गॅम्बिट्सच्या माध्यमातून तु ग्लोबल चेस लीगमध्येही स्पर्धेची पातळी वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देशील. आशा आहे की तुझे उंट आणि हत्ती देखील तुझ्या ऑफ-स्पिन बॉल्सप्रमाणे सर्वांचा फडशा पाडतील”.