आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज आहेत. रविवार (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने स्फोटक खेळ केला आहे. लीग स्टेजपासून टीम इंडिया अपराजित आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघाने खराब सुरुवातीनंतर ज्या प्रकारे पुनरागमन केले तेही कौतुकास्पद आहे.
आता हे दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात साखळी फेरीतील सामना चेन्नईत झाला होता. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
दरम्यान, आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फायनलबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. एका वर्तमानपत्राशी संवाद साधताना शास्त्री म्हणाले की, दोन्ही संघांची पहिली १० षटके अंतिम फेरीतील विजय किंवा पराभव ठरवतील.
रवी शास्त्री म्हणाले, 'मला विश्वास आहे की सामन्यातील पहिली १० षटके खूप महत्त्वाची ठरतील. या षटकांमध्ये भारताला स्फोटक सुरुवातीची गरज आहे. विशेषत: रोहित शर्म ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्याला ते पुढे चालू ठेवावे लागेल. ऑस्ट्रेलियातही असंच काहीसं घडतंय. पहिल्या १० षटकांत चांगली सुरुवात केल्यास त्यांना आत्मविश्वास मिळेल. डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे त्यांच्या संघातील अतिशय धोकादायक खेळाडू आहेत.
याशिवाय रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या फॉर्मवरही आपलं मत मांडलं. शास्त्री म्हणाले, 'तो स्वतःची कथा लिहित आहे. तो ज्या प्रकारे खेळत आहे. त्याच्या बॅटमधून आणखी एक शतक झळकले तर आश्चर्य वाटायला नको. त्याने उपांत्य फेरीत ते दाखवून दिले आहे आणि ते अंतिम फेरीतही ते होऊ शकते आणि यापेक्षा मोठे काही असू शकत नाही".
अंतिम सामन्यापूर्वी गोलंदाजीबाबत शास्त्री म्हणाले, 'सध्या आपल्याकडे सर्वोत्तम वेगवान आक्रमण आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. याशिवाय रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने दर्जेदार फिरकीपटूही आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे गोलंदाजीत खूप वैविध्य आहे".