क्रिेकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने स्पर्धेतील सर्व अव्वल संघांना पराभूत केले. क्रिकेट पंडितांच्या मते आता टीम इंडियाला रोखणे कुणालाही शक्य नाही.
तर दुसरीकडे, भारतीय संघ यावेळी चॅम्पियन झाला नाही, तर पुढील तीन विश्वचषकांची वाट पाहावी लागेल, असे मत माजी कर्णधार आणि संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
शास्त्री यांनी एका पॉडकास्ट दरम्यान सांगितले की, सध्या भारताचे बहुतेक खेळाडू आपल्या शिखरावर आहेत, त्यामुळे त्यांना आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची मोठी संधी आहे.
रवी शास्त्री म्हणाले, 'सध्या देशभरात क्रिकेटची क्रेझ आहे. १२ वर्षांपूर्वी भारताने विश्वचषक जिंकला होता. आता त्यांना पुन्हा तशीच कमाल करण्याची संधी आहे. भारतीय संघ ज्याप्रकारे खेळत आहे, ते पाहता ही कदाचित त्यांच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे.
जर आपण यावेळी हुकलो, तर वर्ल्डकप जिंकण्याचा विचार करण्यासाठी आपल्याला पुढील ३ विश्वचषकांची वाट पाहावी लागेल. यावेळी संघातील ७-८ खेळाडू आपल्या शिखरावर आहेत.
सोबतच रवी शास्त्री म्हणाले की, 'हा वर्ल्डकप काही खेळाडूंचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. ते ज्या पद्धतीने खेळत आहेत आणि परिस्थिती पाहता त्यांनी यावेळी विजेतेपद पटकावले पाहिजे".
"भारताकडे सध्या सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. हे विलक्षण आहे पण त्यासाठी वेळ लागला आणि ते एका रात्रीत घडले नाही. गेल्या ४-५ वर्षांपासून ते एकमेकांसोबत खेळत आहेत. ३ वर्षांपूर्वी मोहम्मद सिराज त्यांच्यात सामील झाला. कामगिरीत सातत्य कसे राखायचे हे त्याला माहित आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी चेंडूने कहर करत आहेत, तर मोहम्मद सिराजला खेळणे देखील विरोधी संघासाठी सोपे नाही. कुलदीप आणि रवींद्र जडेजा ही जोडी फिरकीत कमाल करत आहे, असेही रवी शास्त्री म्हणाले.
दरम्यान, टीम इंडियाने या स्पर्धेत सलग ८ सामने जिंकले असून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहून सेमीफायनल गाठली आहे.