pm modi visit team india dressing room : वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव टीम इंडियाच्या चांगलाच जिव्हारी लागला. सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि त्यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
पंतप्रधान मोदींच्या या कृतीवर माजी भारतीय क्रिकेटर आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
किर्ती आझाद म्हणाले होते की, खेळाडू आणि कोचिंग स्टाफशिवाय कोणीही ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रूमच्या बाहेर भारतीय खेळाडूंना भेटायला हवे होते. मी हे एक नेता म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून सांगत आहे."
पण, आता किर्ती आझाद यांच्या आक्षेपानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वक्तव्य आले आहे. रवी शास्त्री म्हणाले की, पंतप्रधानांना ड्रेसिंग रूममध्ये भेटणे खूप आनंददायी होते, कारण मला माहित आहे की त्या वेळी ड्रेसिंग रूममध्ये कसे वातावरण असेल, त्या ड्रेसिंग रूमचा एक भाग राहिलो आहे. देशाच्या पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूमला भेट देणे ही मोठी गोष्ट आहे".
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल हरल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू खूपच निराश होते. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. पण यानंतर नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये जावून खेळाडूंचे मनोधैर्य वाढवले आणि त्यांना दिलासा दिला.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही १०-१० सामने जिंकून इथवर पोहोचले आहात, खेळात हे होतच असते. हसा आणि मान ताठ ठेवा संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत आहे'.
यासोबतच पीएम मोदी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडला म्हणाले की, " राहुल, तुम्ही लोकांनी खूप मेहनत केली आहे'.
यानंतर पंतप्रधानांनी मोहम्मद शमीला मिठी मारली आणि तू शानदार कामगिरी केली आहेस, असे म्हणत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
भारताचे पंतप्रधान ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटत होते, तेव्हा गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.