झिम्बाब्वेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रवी बिश्नोईने आपल्या दमदार क्षेत्ररक्षणाने खळबळ उडवून दिली. आवेश खानच्या चेंडूवर रवी बिश्नोईने असा अप्रतिम झेल घेतला की, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल.
पॉवर प्लेमध्ये आवेश खानने डावाच्या चौथ्या षटकात ब्रायन बेनेटला पहिला चेंडू टाकला. ऑफ स्टंपवरील चेंडूवर ब्रायनने पॉइंटच्या दिशेने कट शॉट खेळला. हा फटका इतका ताकदवान होता की तो थेट ४ धावांपर्यंत गेला असता, पण ब्रायनच्या शॉटच्या आड रवी बिश्नोई आला. बिश्नोनईने हवेत झेप घेत झेल टिपला.
यानंतर आवेश खानसह सर्व खेळाडू त्याच्याकडे धावत आले आणि त्याला मिठी मारली. हा झेल पकडण्यासाठी रवीकडे काही सेकंदांचा अवधी होता. रवीने ज्या पद्धतीने चेंडू पकडला ते पाहता, टी-20 क्रिकेटमधील आतापर्यंतच्या पॉइंट या क्षेत्रात घेतलेल्या सर्वोत्कृष्ट झेलांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.
झिम्बाब्वेचा पराभव, भारत २-१ ने आघाडीवर
टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा २३धावांनी पराभव केला आहे. या विजयासह त्याने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत ४ गडी गमावून १८२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाला २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १५९ धावा करता आल्या. त्यांच्याकडून मायर्सने नाबाद अर्धशतक झळकावले. मायर्सने ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६५ धावा केल्या. क्लायने ३७ धावांची खेळी खेळली. वेलिंग्टन १८ धावा करून नाबाद राहिला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाला सुरुवात केली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी झाली. टीम इंडियाची पहिली विकेट यशस्वीच्या रूपाने पडली. यशस्वीने २७ चेंडूत ३६ धावा केल्या. तर शुभम गिलने ४९ चेंडूत ६६ धावांचे योगदान दिले.
शुभमन व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाडने २८ चेंडूत ४९ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकारही मारले. याशिवाय संजू सॅमसन १२ धावा करून नाबाद राहिला तर अभिषेक शर्माने ९ चेंडूत १० धावांची खेळी केली.
संबंधित बातम्या