IND vs ENG : रवी बिष्णोईचे दोन चौकार भारत विसरणार नाही, त्या १५ धावांमुळे सामना टीम इंडियाने जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : रवी बिष्णोईचे दोन चौकार भारत विसरणार नाही, त्या १५ धावांमुळे सामना टीम इंडियाने जिंकला

IND vs ENG : रवी बिष्णोईचे दोन चौकार भारत विसरणार नाही, त्या १५ धावांमुळे सामना टीम इंडियाने जिंकला

Jan 26, 2025 11:31 AM IST

Ind vs Eng 2nd T20 : इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्यात तिलक वर्माने ७१ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. पण तिलकसोबतच गोलंदाज अर्शदीप सिंग आणि रवी बिष्णोई यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या दोघांनी मिळून १५ धावा केल्या आणि तिलक वर्माचा दबाव कमी केला.

IND vs ENG : रवी बिष्णोईचे ते दोन चौकार भारत विसरणार नाही, सामन्याचं चित्रचं बदललं
IND vs ENG : रवी बिष्णोईचे ते दोन चौकार भारत विसरणार नाही, सामन्याचं चित्रचं बदललं (AFP)

Ravi Bishnoi And Arshdeep Singh : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो तिलक वर्मा. ऐकीकडे टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत होते, पण दुसरीकडे तिलकने एक टोक सांभाळून नाबाद ७२ धावांची शानदार खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि चौकार मारून सामना संपवला. 

या खेळीबद्दल तिलक वर्मा याचे खूप कौतुक होत आहे. भारतीय संघाची अवस्था एकवेळ १५ षटकात ७ बाद १२६ धावा अशी होती. संघाला ३१ चेंडूत ४० धावा हव्या होत्या. धावा कमी होत्या पण फक्त तीन विकेट्स शिल्लक होत्या. इथून तिलकला ९ आणि १० नंबरच्या फलंदाजांची साथ मिळाली.

बिष्णोई आणि अर्शदीप यांचा मोलाचा वाटा

अर्शदीप सिंग ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. एका चौकाराच्या सहाय्याने त्याने ४ चेंडूत ६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या रवी बिश्नोईने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने २ चौकार मारले.

बिष्णोईने इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ब्रायडन कार्सला फ्लीप शॉट मारून चौकार वसूल केला. हा शॉट एखाद्या प्रॉपर फलंदाजासारखा आणि पाहण्यासारखा होता. यानंतर बिष्णोईने पुढच्याच षटकात फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोनला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक चौकार मारला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. या दोन्ही गोलंदाजांनी १६७ च्या स्ट्राईक रेटने ९ चेंडूत १५ धावा केल्या.

बिष्णोई चांगल्या दर्जाचा फलंदाज 

लेगस्पिनर रवी बिश्नोई गोलंदाजीसोबतच फलंदाजी सुधारण्यावर भर देतो. जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तो फलंदाजीच्या सरावात मागे राहिला नाही. चेन्नई टी-20 पूर्वीही त्याने बॅट आणि पॅडसह फोटो पोस्ट केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते, फक्त फलंदाजांनाच मजा का मिळावी?

फलंदाजीसह गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे 

अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनीही टीम इंडियाला मोठा धडा दिला आहे. अलीकडच्या काळात भारतीय गोलंदाज फलंदाजीत योगदान देऊ शकत नसल्याचे दिसून आले आहे.

एक काळ असा होता जेव्हा झहीर खान, एस श्रीशांत, हरभजन सिंग, अनिल कुंबळे आणि प्रवीण कुमार सारखे गोलंदाज गरज भासल्यास चांगली फलंदाजीही करत असत. भुवनेश्वर कुमार हाही फलंदाजीत मोलाचे योगदान देत होता. गोलंदाजांकडून बॅटने आलेले छोटे योगदान सामन्यात खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या