अफगाणिस्तानचा महान अष्टपैलू खेळाडू रशीद खान विवाहबंधनात अडकला आहे. काबूलमध्ये राशीद खानच्या विवाहसोहळा पार पडला. राशीदच्या लग्नाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आल्यावरच राशीदच्या लग्नाची माहिती लोकांना मिळाली.
राशिदच्या लग्नाचे फोटो समोर येताच ते व्हायरल झाले आणि सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
काबूलमध्ये झालेला विवाह एकट्या रशीदचा नव्हता. याच दिवशी त्याच्या तीन भावांचेही लग्न झाले. म्हणजे चारही भावांचे लग्न एकाच दिवशी झाले. या विवाहसोहळ्यात मोहम्मद नबी याच्यासह अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अनेक क्रिकेटपटू या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
काबूलमधील इम्पीरियल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये राशिदचा विवाह झाला. या हॉटेलबाहेर काही लोक बंदुकांसह दिसत आहेत. सध्या अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आहे. मात्र, समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये राशिदची पत्नी दिसत नाही किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहितीउपलब्ध नाही.
दरम्यान राशीद खान एवढ्यात लग्न करेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. अशा परिस्थितीत जेव्हा त्याच्या लग्नाचे फोटो आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मात्र त्याच्या चाहत्यांनी या मिस्ट्री स्पिनरवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आणि त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.
राशिद खानने १८ ऑक्टोबर २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात राशिदने १० षटकात एकूण २० धावा दिल्या आणि १ बळी घेतला. आयपीएलमध्ये राशिद खान सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.
अफगाणिस्तानचे नेतृत्व करणारा राशिद खान हा सर्वात तरुण कर्णधार आहे. राशिदने अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत एकूण ५ कसोटी, १०५ एकदिवसीय आणि ९३ टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर कसोटीत ३४, वनडेत १९० आणि टी-20 मध्ये १५२ विकेट्स आहेत. राशीदने एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ५ अर्धशतकेही केली आहेत.
संबंधित बातम्या