अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू रशीद खानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली. विशेष म्हणजे, शुक्रवारी (२० सप्टेंबर) राशीद खानचा २६ वा वाढदिवस होता. वाढदिवशी राशिदने केलेल्या घातक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा १७७ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तान संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
अफगाणिस्तानच्या या विजयामुळे राशिद खानचा वाढदिवसही खास झाला आणि त्याच्या नावावर एक अनोखा विक्रमही नोंदवला गेला.
सामन्यानंतर राशिद खानने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत तो सामना खेळला. यादरम्यान त्याने आफ्रिकन फलंदाजांना एकामागोमाग तंबूत पाठवले आणि ५ विकेट्स घेतल्या. धावांच्या बाबतीत अफगाणिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली वनडे मालिकाही आहे.
आयसीसी क्रमवारीत अव्वल पाचमध्ये असलेल्या संघाविरुद्धच्या पहिल्या मालिका विजयानंतर राशिद म्हणाला, “बऱ्याच काळानंतर ५ विकेट्स घेतल्या. मला गेल्या एक महिन्यापासून माझ्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाली आहे, पण मला मैदानावर राहून संघाला मदत करायची होती. महत्त्वाची मालिका जिंकण्याची आमच्यासाठी मोठी संधी होती, त्यामुळे मला योगदान द्यायचे होते.
तो म्हणाला, 'मला युवा गोलंदाजांसोबत गोलंदाजी करायला आवडते. मी माझा दृष्टीकोन त्यांच्याशी शेअर करतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते ऐकतात आणि त्या गोष्टींमधून शिकतात. तरुण पुढे येत आहेत आणि त्यांची प्रतिभा दाखवत आहेत हे खूप छान आहे. राशिदने अवघ्या १९ धावांत ५ विकेट्स घेतल्या.
वाढदिवशी ५ विकेट घेणारा राशिद पहिला वनडे गोलंदाज ठरला. वर्नान फिलँडर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी त्यांच्या वाढदिवशी एकदिवसीय सामन्यात ४ विकेट घेतल्या आहेत. पण राशिदने वनडेत आपल्या वाढदिवशी ५ विकेट घेतल्या.
दरम्यान, राशीदला सामन्यात फलंदाजी करताना अंगठ्याची समस्या पुन्हा उद्भवली होती. ४७व्या षटकात खेळताना त्याने पहिल्या चेंडूवर दोन धावा केल्या, पण त्याला लगेच फिजिओची मदत हवी होती. असे असतानाही त्याने फलंदाजी सुरूच ठेवली आणि १२ चेंडूत नाबाद ६ धावा केल्या. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे रविवारी खेळवला जाणार आहे.