Afghanistan vs Zimbabwe 2nd Test : अफगाणिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. अफगाणिस्तानने दुसरी कसोटी ७२ धावांनी जिंकली. तर पहिली कसोटी अनिर्णित राहिली. अफगाणिस्तानसाठी राशिद खानने घातक गोलंदाजी करताना सामन्यात एकूण ११ विकेट घेतल्या.
बुलावायो येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानकडून रहमत शाह आणि इस्मत आलम यांनी शतके ठोकली.
बुलावायो कसोटीत झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी पहिल्या डावात अफगाणिस्तानला १५७ धावांवर ऑल आऊट केले होते. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि न्यूमन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी दाखवली.
संघाने पहिल्या डावात २४३ धावा केल्या. यादरम्यान क्रेग आयर्विन याने ७५ धावांची दमदार खेळी केली. तर सिकंदर रझाने ६१ धावांची भर घातली. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने या डावात ४ विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात खेळ पालटला. त्यांनी दुसऱ्या डावात ३६३ धावा केल्या. यादरम्यान रहमतने १३९ धावांची खेळी केली. त्याने १४ चौकार मारले. तर इस्मतने १०१ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या डावात २०५ धावा करत सर्वबाद झाला. या डावात आयर्विनने अर्धशतक झळकावले, त्याने ५३ धावा केल्या.
राशिदने या सामन्यात एकूण ११ विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात राशिदने ४ बळी घेतले. तर दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेतल्या. या डावातील २७.३ षटकात त्याने ६६ धावा दिल्या आणि ३ मेडन षटके टाकली.