Ravindra Jadeja 12 Wickets Ranji Trophy Match : टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्याने रणजी ट्रॉफीचा उत्साह वाढला आहे. रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या सामन्यात, अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या सौराष्ट्र संघाने ऋषभ पंतच्या दिल्ली संघाचा केवळ ३.१ षटकांत म्हणजे १९ चेंडूत १० विकेट्सनी धुव्वा उडवला.
सामन्याचा नायक रवींद्र जडेजा होता, ज्याने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात ७ फलंदाजांना बाद केले. अशा प्रकारे त्याने सामन्यात १२ विकेट घेत दिल्लीचा पराभव केला. हे दिल्लीसाठी खरोखरच लाजिरवाणे आहे.
सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४९.४ षटकांत सर्व गडी गमावून १८८ धावा केल्या. कर्णधार आयुष बडोनीने संघाकडून सर्वाधिक ६० धावांची खेळी खेळली, रोहित शर्माचा आवडता यष्टीरक्षक ऋषभ पंत केवळ १ धाव करून बाद झाला. त्याला धर्मेंद्र सिंह जडेजाने बाद केले. तर टीम इंडियाचा ऑलराऊरंडर रवींद्र जडेजाने या डावात ६६ धावा देत ५ बळी घेतले.
त्यानंतर सौराष्ट्रने पहिल्या डावात ७२.२ षटकांत २७१ धावा केल्या. त्यांच्याकडून सलामीवीर हार्विक देसाईने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली, तर रवींद्र जडेजाने ३८ आणि एव्ही वासवडा याने ६२ धावा केल्या.
दिल्लीकडून हर्ष त्यागीने ४ बळी घेतले, तर आयुष बडोनीने येथेही आश्चर्यकारक कामगिरी करत ३ बळी घेतले.
दुसऱ्या डावात दिल्लीला आपल्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. यावेळी अवघ्या ९४ धावांत संपूर्ण संघ गडगडला. पुन्हा एकदा आयुष बडोनीने ४४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली आणि संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या टोकाला त्याला साथ मिळाली नाही. यावेळी रवींद्र जडेजाने सुरुवातीपासूनच घातक गोलंदाजी केली. त्याने ३८ धावांत ७ बळी घेतले.
संबंधित बातम्या