भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने गेल्या काही वर्षांत भारतीय कसोटी संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्याने संघासाठी ही चांगली कामगिरी केली आहे. या दरम्यान, यशस्वीचा मोठा भाऊ तेजस्वी यानेही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले आहे.
यशस्वी जयस्वालने शनिवारी आपल्या मोठ्या भावाचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांना समजले की यशस्वीचा मोठा भाऊ देखील एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे.
तेजस्वीने सध्या सुरू असलेल्या रणजी करंडक हंगामाच्या दुसऱ्या फेरीत त्रिपुराकडून देशांतर्गत पदार्पण केले. २७ वर्षीय तेजस्वीने पदार्पणाच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पहिल्या डावात तो स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याला केवळ १३ धावा करता आल्या. त्याने आपल्या डावात ३ चौकार ठोकले.
यानंतर मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तेजस्वीने क्रिझवर काही काळ घालवला आणि १९ चेंडू खेळले. पण त्याला केवळ ४ धावा करता आल्या. बडोद्याविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तेजस्वीने १५९ चेंडूत ८२ धावांची दमदार खेळी केली. मात्र, त्याने शतक झळकावण्याची सुवर्णसंधी गमावली.
बडोद्याच्या पहिल्या डावातील २३५ धावांच्या प्रत्युत्तरात त्रिपुराने आपला डाव सात बाद ४८२ धावांवर घोषित केला. बडोद्याने दुसऱ्या डावात ४ गडी गमावून २४१ धावा केल्या आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
त्रिपुराने याआधी बिक्रम कुमार दास (९७), जीवनजोत सिंग (९४), तेजस्वी जयस्वाल (८२), श्रीदाम पॉल (७३) आणि मनदीप सिंग (नाबाद ७४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २४७ धावांची आघाडी घेतली होती. तेजस्वी हा भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याचा मोठा भाऊ आहे.