Virat Kohli News: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अनेक वर्षानंतर दिल्लीकडून रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. यामुळे विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर मोठी गर्दी केली. कोहलीचा सामना संस्मरणीय करण्यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामन्यात प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश ठेवला. मात्र, या सामन्यात विराट कोहलीच्या एका चाहत्याने मैदानात घुसून सर्व सुरक्षा व्यवस्था मोडीत काढल्याचा प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराट कोहली तब्बल १२ वर्षांनंतर देशांतर्गत सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दिल्ली आणि रेल्वेविरुद्धच्या रणजी सामन्यात विराट कोहलीच्या एका चाहत्याने मैदानात घुसून सर्व सुरक्षा व्यवस्था मोडीत काढली. या चाहत्याने थेट विराट कोहलीजवळ पोहोचून त्याच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर काही सेकंदात सुरक्षा रक्षक तिथे पोहोचले आणि त्यांनी चाहत्याला मैदानाबाहेर नेले. यावेळी सुरक्षा रक्षकही त्याला मारहाण करू लागले. परंतु, विराट कोहलीने तसे करण्यास विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी पहाटे ३ वाजल्यापासून स्टेडियमबाहेर रांगा लावल्या होत्या. गेट उघडेपर्यंत स्टेडियमबाहेर मोठी गर्दी जमली होती. सुमारे १० हजार चाहत्यांना हा सामना पाहायला मिळणार आहे. दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जात आहे. आधार कार्ड दाखवल्यानंतरच चाहत्यांना प्रवेश मिळेल. रणजी सामन्यासाठी चाहत्यांमध्ये एवढी क्रेझ आपण यापूर्वी पाहिली नसेल.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमबाहेर पोहोचलेल्या चाहत्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात चाहते विराट कोहली आणि आरसीबी अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. याशिवाय, विराट कोहलीचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी लांब रांग लावण्यात आल्याचा दावाही एका व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. काही ठिकाणी स्टेडियममध्ये काम सुरू असल्याने स्टेडियमच्या या सामन्यासाठी मोजकेच दरवाजे आणि काही स्टँड उघडण्यात येणार आहेत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने पाच सामन्यांच्या ९ डावात २३.७५ च्या सरासरीने १९० धावा केल्या. त्याला पाच डावात दुहेरी आकडा पार करता आलेला नाही. त्याला फक्त चार डावात १० पेक्षा जास्त धावांचा आकडा ओलांडता आला आहे. या मालिकेत विराट कोहलीने ५, नाबाद १००, ७, ११, ३, ३६, ५, १७ आणि ६ धावा केल्या आहेत. विराट कोहलीसाठी २०२४ हे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी खूप वाईट ठरले आहे. मात्र, नवीन वर्षात विराट कोहली चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
संबंधित बातम्या