टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंची खराब कामगिरी अजूनही कायम आहे. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. पण येथेही ते विशेष काही करू शकले नाहीत. यशस्वी आणि रोहित मुंबईकडून खेळत आहेत. तर ऋषभ पंत दिल्लीकडून खेळत आहे.
आज मुंबईचा सामना जम्मू-काश्मीरविरुद्ध सुरू आहे. मुंबईच्या बीकेसी येथील मैदानावर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.यानंतर संपूर्ण संघ केवळ १२० धावांत गारद झाला.
सलामीवीर यशस्वी अवघ्या ४ धावा करून बाद झाला. तर रोहित ३ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरलाही विशेष काही करता आले नाही. ७ चेंडूत ११ धावा करून तो बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणे १२ धावा करू शकला. शिवम दुबेला खातेही उघडता आले नाही.
ऋषभ पंत दिल्लीकडून खेळत आहे. राजकोटमध्ये दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यात सामना होत आहे. दिल्लीच्या पहिल्या डावात पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पण तो केवळ २ धावा काढून बाद झाला.
तर शुभमन गिल पंजाब संघाचा एक भाग आहे आणि तो कर्णधारही आहे. बंगळुरूमध्ये पंजाब आणि कर्नाटक यांच्यात सामना होत आहे. गिल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. तो सलामीला फलंदाजीला आला होता.
रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर मध्य प्रदेशकडून खेळत आहेत. मध्य प्रदेश आणि केरळमध्ये लढत होत आहे. यादरम्यान मध्य प्रदेशने ५३ धावांवर ५ विकेट गमावल्या. पाटीदार खाते न उघडताच बाद झाला. तर व्यंकटेश २ धावा करून तंबूत परतला.
संबंधित बातम्या