रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि जम्मू काश्मीर आमनेसामने आहेत. या सामन्यात अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ सपशेल फ्लॉप झाला. मुंबईचा संघ पहिल्या डावात अवघ्या १२० धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडे रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू होते, जे काही विशेष करू शकले नाहीत. मात्र, शार्दुल ठाकूरने आपली ताकद दाखवून दिली. त्याने अर्धशतक झळकावले.
मुंबईसाठी यशस्वी आणि रोहित सलामीला आले. यादरम्यान रोहित अवघ्या ३ धावा करून बाद झाला. तर यशस्वी ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार रहाणे १७ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. हार्दिक तामोरेलाही केवळ ७ धावा करता आल्या. श्रेयस अय्यरने ७ चेंडूत ११ धावा केल्या.
शिवम दुबे याला खातेही उघडता आले नाही. तनुष कोटियनने २६ धावांचे योगदान दिले. त्याने ५ चौकार मारले. तर शार्दुलने अर्धशतक झळकावले.
एकवेळी मुंबईने ४१ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. यानंतर शार्दुल ठाकूरने मुंबईची इज्जत वाचवली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने १०० धावांचा टप्पा ओलांडला. शार्दुलने ५७ चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले.
अशाप्रकारे मुंबईने ३३.२ षटकांत सर्वबाद १२० धावा केल्या. शार्दुलबद्दल बोलायचे झाले तर त्याने याआधी अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. शार्दुलने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही कमाल केली आहे.
जम्मू-काश्मीरसाठी युधवीर सिंग याने संघासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने ८.२ षटकात केवळ ३१ धावा दिल्या. या दरम्यान ४ बळी घेतले. युधवीरने २ मेडन षटकेही टाकली. त्याने शार्दुल ठाकूरला बाद केले. याआधी श्रेयस अय्यर आणि शम्स मुलाणी यांनाही बाद झाले होते. उमर नजीरनेही ४ बळी घेतले. त्याने ११ षटकात ४१ धावा दिल्या. नबीने २ बळी घेतले.
जम्मू-काश्मीरने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ बाद १७४ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शुभम खजोरियाने ५३ धावा केल्या. तर मुंबईकडून मोहित अवस्थीने ३, शम्स मुलाणीने २ तर शार्दुल ठाकूरने एक विकेट घेतला.
संबंधित बातम्या