मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा दबदबा कायम, विक्रमी ४८व्यांदा फायनलमध्ये धडक

Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा दबदबा कायम, विक्रमी ४८व्यांदा फायनलमध्ये धडक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 04, 2024 06:38 PM IST

ranji trophy 2024 : मुंबईने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईने तामिळनाडूचा पराभव करून ४८व्यांदा फायनल गाठली आहे. आता अंतिम सामन्यात मुंबईचा सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

ranji trophy 2024
ranji trophy 2024 (PTI)

मुंबईने रणजी ट्रॉफी २०२४ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईने सेमी फायनलच्या सामन्यात तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव केला. मुंबईने ४८व्यांदा रणजी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर हा संघ ४१ वेळा चॅम्पियन बनला आहे.

या सामन्यात मुंबईने तामिळनाडूचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात तामिळनाडू संघाने पहिल्या डावात १४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईने पहिल्या डावात ३७८ धावा करत २३२ धावांची मोठी आघाडी घेतली. 

यानंतर तामिळनाडूचे फलंदाज दुसऱ्या डावातही फ्लॉप झाले. त्यांचा दुसरा डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. अशा परिस्थितीत मुंबईने हा सामना एक डाव आणि ७० धावांनी जिंकला. आता अंतिम फेरीत मुंबईचा सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे.

शार्दुल ठाकूर विजयाचा हिरो

या सामन्यात अष्टपैलू शार्दुल ठाकूर मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्याच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने शानदार शतक झळकावले. पहिल्या डावात मुंबई संघाने अवघ्या १०६ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ९व्या क्रमांकावर येऊन शार्दुलने १०९ धावांची खेळी केली. 

शार्दुलने १०५ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकार आले. विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे पहिलेच शतक होते. याशिवाय या सामन्यात त्याने ४ विकेट्सही आपल्या नावावर केल्या.

मागील सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या मुशीर खानने या सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. १३१ चेंडूत ५५ धावा करून तो बाद झाला. याशिवाय श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे या सामन्यात फ्लॉप ठरले. श्रेयस अय्यरने केवळ ३ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

WhatsApp channel