रणजी ट्रॉफी २०२३-२४ चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विदर्भाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईचा संघ पहिल्या डावात २२४ धावांवर ऑलआऊट झाला.
मुंबईकडून शार्दुल ठाकूरने दमदार कामगिरी केली. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी खेळली. शार्दुलसोबत पृथ्वी शॉनेही चांगली फलंदाजी केली.
दुसरीकडे, विदर्भाकडून यश ठाकूर आणि हर्ष दुबे यांनी घातक गोलंदाजी करताना ३-३ बळी घेतले. उमेश यादवलाही दोन बळी मिळाले. या सामन्याच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरले.
शार्दुल ठाकूरने मुंबईच्या बुडत्या डावाला सावरण्याचे काम केले. मुंबईने १११ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. यानंतर शादूल ठाकूरने ६९ चेंडूंचा सामना करत ७५ धावा केल्या. शार्दुलच्या या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. अशा प्रकारे मुंबईने पहिल्या डावात २०० धावांचा टप्पा पार केला.
तत्पूर्ली, पृथ्वी आणि भूपेन लालवानी संघासाठी सलामीला आले. पृथ्वीने ६३ चेंडूंचा सामना करत ४६ धावा केल्या. त्याने ५ चौकार मारले. लालवानीने ६४ चेंडूंचा सामना करत ३७ धावा केल्या. त्याने ४ चौकार मारले. मुशीर खान १२ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेलाही विशेष काही करता आले नाही. ४१ चेंडूत ५ धावा करून तो बाद झाला. शम्स मुलाणीने १३ धावांचे योगदान दिले.
टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे अंतिम सामन्यात फ्लॉप ठरले. रहाणे ३५ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. त्याला एकही चौकार मारता आला नाही. श्रेयस अय्यर १५ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. त्याने १ चौकार मारला. या दोन्ही फलंदाजांना गेल्या काही सामन्यांमध्ये फारशी कामगिरी करता आलेली नाही.