Rashid Latif Viral Video : पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफ यांनी अनेकदा भारताविरुद्ध खूप गरळ ओकली होती. पण, आता त्यांनी अभिमानाने स्वत:चे भारताशी संबंध असल्याचे सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू झाला आणि अखेर पाकिस्तानला हायब्रीड मॉडेल मान्य करावं लागलं. मात्र, या दरम्यान लतीफने आधी डॉनची भीती दाखवत धमकावण्याचा प्रयत्न केला आणि मग अभिमानाने आपलं भारतीय कनेक्शन सांगितलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लतीफ उत्तर प्रदेशातील सुलतानपूरशी आपले कनेक्शन असल्याचे सांगत आहे.
यावेळी लोकांनी आपल्याशी पंगा घेऊ नये, असे देखील ते म्हणाले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आधी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये होऊ देणार नाही यावर ठाम होते. मात्र, पुन्हा एकदा पीसीबीने नेहमीप्रमाणे उलटफेर केला आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीडमध्ये करण्यास मंजूरी दिली. यात भारतीय संघ आपले सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ ठिकाणी खेळताना दिसेल.
लतीफ या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसले की,'देश सोडून दिला म्हणून विसरून जाणार का... रंग निळा आहे आमचा! नाही का... माझा एक भाऊ सुलतानपूरमध्ये राहतो, आमचे ९० टक्के कुटुंब सुलतानपूरमध्ये राहते. युरोपियन लोकांनी उगाच उत्तर प्रदेशला अप्पर प्रोव्हिन्स असे नाव दिले नाही.'
राशिद लतीफ म्हणाले की, ‘राजकारणात, मनात आणि शिव्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आम्ही तिथले आहोत, त्यामुळे आमच्याशी पंगा घ्यायचा नाही.’ राशिद लतीफचा सावत्र भाऊ भारतात असून, तो कोलकात्यातील एका वृत्तसंस्थेत काम करतो. राशिद लतीफने नुकताच एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यात त्याने डॉन दाऊद इब्राहिमशी असलेले आपले कनेक्शन सांगितले होते.
यंदाच्या म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे यजमानपद पाकिस्तानने भूषवले होते. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या खेळाडूंना पाकिस्तानात जाऊन खेळू देण्यास नकार दिला, ज्याचा फटका पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंना बसला. यावेळी राशिद लतीफ यांनीही भावनेच्या भरात दाऊद इब्राहिमची धमकी दिली होती. यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले आहे.
संबंधित बातम्या