मध्य प्रदेशचा स्टार खेळाडू रजत पाटीदार याने चमत्कार केला आहे. पाटीदारने रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या सामन्यात अवघ्या ६८ चेंडूत शतक केले. मात्र, पाटीदारला रणजीतील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडता आला नाही.
वृत्त लिहिपर्यंत त्याने हरियाणाविरुद्धच्या सामन्यात ९७ चेंडूंचा सामना करताना १५० धावा केल्या होत्या. पाटीदारच्या या खेळीमुळे मध्य प्रदेशने ३ गडी गमावून २९९ धावा केल्या होत्या.
IPL २०२५ साठी मेगा लिलाव या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. पण त्याआधी, सर्व आयपीएल संघ रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करतील.
रजत पाटीदारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ रिटेन करू शकतो की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण जर तो रीलीज झाला तर आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. पाटीदार हा स्फोटक फलंदाजीमध्ये निपुण असून त्याने अनेकवेळा ते दाखवून दिले आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात हरियाणाविरुद्धही त्याने असेच केले होते.
वास्तविक, रणजी ट्रॉफी एलिट २०२४-२५ चा सामना हरियाणा आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाटीदार मध्य प्रदेशसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या डावात त्याने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावले. शतक पूर्ण करण्यासाठी रजत पाटीदारने ६८ चेंडू घेतले. पाटीदार यांचे हे विक्रमी शतक होते.
रजत पाटीदारने टीम इंडियासाठी तीन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र यात त्याला विशेष काही करता आले नाही. त्याने भारतासाठी एक वनडे सामनाही खेळला आहे. रजत पाटीदारचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने ६३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३४४ धावा केल्या आहेत. त्याने १२ शतके आणि २३ अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्ये पाटीदारची सर्वोत्तम धावसंख्या १९६ धावा आहे.
संबंधित बातम्या