Rajat Patidar to Lead RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कर्णधारपदी रजत पाटीदार याची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट संचालक मो बोबाट आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यामुळं विराटच्या नावाची चर्चा हवेतच विरली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसनं गेल्या तीन मोसमात आरसीबी संघाचं नेतृत्व केलं होतं, परंतु त्याला फ्रँचायझीतून बाहेर काढल्यानंतर आरसीबीनं नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला होता. विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, संघ व्यवस्थापनानं त्याऐवजी पाटीदारवर विश्वास ठेवला.
'क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंकडून शिकण्याची ही माझ्यासाठी मोठी संधी आहे, असे मला वाटतं. त्यांचा अनुभव मला माझ्या नेतृत्वाच्या भूमिकेत मदत करेल. मी विराट कोहलीसोबत बरंच खेळलो आहे. त्यांचं माझं ट्युनिंग चांगलं आहे. त्याच्या अनुभवाचा मला फायदा होईल, असं रजत पाटीदार नव्या जबाबदारीबद्दल बोलताना म्हणाला.
रजत पाटीदारनं गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत भारताकडून पदार्पण केलं होतं, परंतु ३२, ९, ५, १७ आणि २ धावांच्या खेळीनंतर त्याला वगळण्यात आलं. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये तो अधिक प्रभावी ठरेल असं बोललं जातं. अलीकडंच त्यानं मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तिथं त्याच्या संघाला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. उजव्या हाताचा हा फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यानं फिरकी गोलंदाजांना त्यानं चोपून काढलं आहे.
रिटेन करण्यात आलेल्या तीन खेळाडूंपैकी एक असलेला पाटीदार आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीमध्ये पहिल्यांदा सामील झाला, तिथं तो फक्त चार सामने खेळला आणि ७१ धावा केल्या. त्यानंतर २०२२ मध्ये दुखापतग्रस्त लवनीथ सिसोदियाच्या जागी २० लाख रुपयांमध्ये तो पुन्हा एकदा फ्रँचायझीमध्ये सामील झाला आणि त्यानं ३३३ धावा केल्या. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ११२ होती. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये त्यानं ही खेळी केली. त्यानंतर दुखापतीमुळं हा डावखुरा फलंदाज २०२३ च्या मोसमात खेळू शकला नाही. गेल्या मोसमात पाटीदारनं ३०.३८ च्या सरासरीनं आणि १७७.१३ च्या स्ट्राईक रेटनं ३९५ धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये आरसीबीकडून २७ सामने खेळत ३४.७४ च्या सरासरीनं आणि १५८.८५ च्या स्ट्राईक रेटनं ७९९ धावा केल्या आहेत. आरसीबीच्या टॉप ऑर्डरमध्ये पाटीदार महत्त्वाचा घटक आहे, पण तो कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी कशी पेलतो हे पाहावं लागेल.
या लिलावात आरसीबीनं कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, टिम डेव्हिड, जितेश शर्मा आणि फिल सॉल्ट या प्रमुख खेळाडूंना विकत घेतलं. मात्र, फ्रँचायझीनं ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज सारख्या काही प्रमुख स्टार खेळाडूंना वगळलं आहे.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेजलवूड, रसिक डार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भांडगे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
संबंधित बातम्या