मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : टीम इंडियात तीन बदल, रजत पाटीदारचं पदार्पण, पण सिराजला का मिळाला डच्चू? पाहा

IND vs ENG : टीम इंडियात तीन बदल, रजत पाटीदारचं पदार्पण, पण सिराजला का मिळाला डच्चू? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 02, 2024 10:12 AM IST

IND vs ENG TEST : विशाखापट्टणममध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs ENG TEST
IND vs ENG TEST

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने रोहित सेनेचा २८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे हा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.

दरम्यान, विशाखापट्टणममध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने या सामन्यापूर्वीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. तर आज नाणेफेकीच्या वेळी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. भारतीय संघात ३ मोठे बदल करण्यात आले आहेत.

रजत पाटीदारचे कसोटी पदार्पण

या सामन्यातून रजत पाटीदारला भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात रजतशिवाय कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांचाही प्लेईंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनसाठी रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यात रंजक लढत झाली. मात्र, कर्णधार रोहित शर्माने सरफराजच्या जागी रजतला संघात स्थान दिले आहे.

रजत पाटीदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. त्याने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्धही धावा केल्या आहेत. पाटीदारने ५५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४५च्या सरासरीने ४ हजार धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या १२ शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत.

सिराजला विश्रांती

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. या तीन खेळाडूंच्या जागी रजत पाटीदार, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांचा संघाच्या प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारताची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव.

इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन - जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi