मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs RR : हार्दिक पंड्याने केली पराभवाची हॅट्ट्रिक! तर सलग तीन विजयांसह संजूचा संघ गुणतालिकेत अव्वल

MI vs RR : हार्दिक पंड्याने केली पराभवाची हॅट्ट्रिक! तर सलग तीन विजयांसह संजूचा संघ गुणतालिकेत अव्वल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2024 11:32 PM IST

MI vs RR IPL 2024 Highlights : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थानने धमाकेदार विजय मिळवला आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने सलग तिसरा सामना हरला आहे.

MI vs RR IPL 2024 Highlights
MI vs RR IPL 2024 Highlights (AP)

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने (RR) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) २०२४ च्या मोसमात जोरदार मुसंडी मारली आहे. या संघाने सोमवारी (१ एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शानदार विजयाची नोंद केली. राजस्थानने मुंबई इंडियन्सचा (MI) ६ गडी राखून पराभव केला.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा सलग तिसरा पराभव आहे. तर राजस्थानचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या मोसमात मुंबईने एकही सामना जिंकलेला नाही, तर राजस्थानने एकही सामना गमावलेला नाही.

मुंबईच्या १२६ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन स्वस्तात बाद झाले, मात्र रियाग परागने ३९ चेंडूत नाबाद ५४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

मुंबईचा डाव

राजस्थान रॉयल्ससमोर मुंबई इंडियन्सचा संघ घरच्या मैदानावर केवळ १२५ धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर नांद्रे बर्गरला दोन विकेट मिळाले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस शून्यावर बाद झाले.

इशान किशन १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हार्दिक पांड्याने २१ चेंडूत ३४ धावा आणि तिलक वर्माने २९ चेंडूत ३२ धावा केल्या, मात्र कर्णधार पंड्या आऊट होताच फलंदाज एक-एका धावेसाठी झगडताना दिसले.

रोहित शर्मा आणि नमन धीरच्या रूपाने पहिल्याच षटकात संघाला २ धक्के बसले. ट्रेंट बोल्टने आपल्या धारदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत सलग दोन चेंडूत दोन बळी घेतले. डावाच्या तिसऱ्या षटकातही डेव्हॉल्ड ब्रेव्हिसच्या रूपाने डावखुऱ्या गोलंदाजाने तिसरे यश मिळवले. तिन्ही फलंदाज शुन्यावर बाद झाले. संघाला चौथा धक्का २० धावांवर इशान किशनच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नांद्रे बर्गररच्या गोलंदाजीवर तो सॅमसनकरवी झेलबाद झाला.

या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी झाली, जी चहलने ७६ धावांच्या स्कोअरवर मोडली. हार्दिकला २१ चेंडूत ३४ धावा करता आल्या. या त्याच्या बॅटमधून ६ चौकार आले. यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पियुष चावलाला केवळ तीन धावा करता आल्या. त्याला आवेश खानने बाद केले.

या सामन्यात मुंबईचा कणा म्हणून उभा राहिलेला तिलक वर्माही यानंतर बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला आपला बळी बनवले. २९ चेंडूत ३२ धावा करून वर्मा माघारी परतला. यानंतर गेराल्ड कोएत्झीने ४ आणि टीम डेव्हिडने १७ धावा केल्या. त्याचवेळी बुमराह ८ धावा करून नाबाद राहिला आणि आकाश मधवाल ४ धावा करून नाबाद राहिला.

IPL_Entry_Point