इंडियन प्रीमियर लीगमध्ये(IPL 2024) आज राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर शनिवारी (६ एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केले.
राजस्थान रॉयल्सचा चालू मोसमातील हा सलग चौथा विजय आहे आणि त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला मागे टाकून पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान गाठले आहे. आरसीबीचा हा ५ सामन्यांमधला चौथा पराभव ठरला.
राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरने नाबाद १०० धावांची खेळी केली. बटलरने ५८ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. राजस्थानला विजयासाठी १ धावेची गरज असताना जोस बटलरने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले.
जोस बटलरच्या शतकाच्या तुलनेत विराट कोहलीचे शतक फिके पडले. बटलरचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. बटलरशिवाय कर्णधार संजू सॅमसननेही ४२ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ६९ धावांची तुफानी खेळी खेळली. सॅमसन आणि बटलरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी झाली.
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोहली आणि फाफ डुप्लेसिसने शानदार शतकी भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत नेले. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ३ बाद १८३ धावा केल्या.
आरसीबीकडून विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. कोहलीने ७२ चेंडूंचा सामना करताना नाबाद ११३ धावा केल्या. तर डुप्लेसिसने ३३ चेंडूत ४४ धावा केल्या.
तर राजस्थानकडून फिरकीपटू युजवेंद्र चहलने ४ षटकांत ३४ धावा देत २ बळी घेतले.नांद्रे बर्गरने ४ षटकांत ३३ धावांत १ बळी घेतला. याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. आवेश खान चांगलाच महागात पडला. त्याने ४ षटकात ४६ धावा दिल्या.