इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला आणि २० षटकात १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १८.४ षटकात १८३ धावा करत सामना जिंकला.
राजस्थान संघाचा या मोसमातील ८ सामन्यातील हा ७ वा विजय आहे. यासह या संघाचे १४ गुण झाले असून त्यांनी प्लेऑफच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे. आता राजस्थान संघाने पुढचा सामना जिंकला तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल. दुसरीकडे, मुंबई संघाचा ८ सामन्यांतील हा ५वा पराभव आहे.
तत्पूर्वी, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने या सामन्यात राजस्थानसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून राजस्थानने १ गडी गमावून १८.४ षटकात सामना जिंकला. राजस्थानच्या विजयाच्या हिरो वेगवान गोलंदाज संदीप शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ठरले. प्रथम संदीपने १८ धावात ५ बळी घेतले. यानंतर राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने ६० चेंडूत १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली.
यादरम्यान त्याने ७ षटकार आणि ९चौकार लगावले. त्याच्याशिवाय कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ३८ आणि जोस बटलरने ३५ धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने एकमेव विकेट घेतली.
तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. ८व्या षटकात ४ फलंदाज केवळ ५२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
यानंतर नेहल वढेरा आणि तिलक वर्मा यांनी ९९ धावांची भागीदारी केली. वढेराने ४९ आणि तिलकने ६५ धावा केल्या. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये राजस्थानने शानदार पुनरागमन केले आणि मुंबईला १७९ धावांवर रोखले. राजस्थानकडून संदीप शर्माने १८ धावांत ५ बळी घेतले. तर ट्रेन्ट बोल्टने दोन बळी घेतले.